नाशिक जिल्ह्यात आज पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी
जिल्ह्यातील ४० हजारांहून अधिक असाक्षर व्यक्तींना मूल्यमापनाची संधी नाशिक, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : - उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT – Foundational Literacy and Numeracy Assessment T
नाशिक जिल्ह्यात आज पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी


जिल्ह्यातील ४० हजारांहून अधिक असाक्षर व्यक्तींना मूल्यमापनाची संधी

नाशिक, 24 ऑक्टोबर (हिं.स.)

: - उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT – Foundational Literacy and Numeracy Assessment Test) रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही चाचणी होणार असून, जिल्ह्यातील नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना आपल्या साक्षरता व संख्याज्ञान कौशल्यांचे मूल्यमापन करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या मूल्यमापन चाचणीसाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत स्त्री असाक्षर २५ हजार ५५४ आणि पुरुष असाक्षर १४ हजार ७४७, अशा एकूण ४० हजार ३०१ असाक्षर व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या सर्व व्यक्तींना या परीक्षेच्या माध्यमातून आपल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्यांचे मूल्यमापन करून घेता येणार आहे.

FLNAT ही प्रौढ व्यक्तींच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्यांचे मूल्यमापन करणारी चाचणी आहे. या चाचणीमध्ये प्रामुख्याने वाचन, लेखन आणि मूलभूत गणितीय कौशल्यांचे मूल्यमापन केले जाते. दैनंदिन जीवनातील व्यवहार समजून घेणे, वाचन-लेखन करणे, अंक ओळखणे तसेच बेरीज-वजाबाकीसारख्या मूलभूत गणितीय क्रिया करता येणे, या कौशल्यांना विशेष महत्त्व दिले जाते.

उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना वाचन, लेखन व संख्याज्ञानाचे मूलभूत कौशल्य प्राप्त करून देणे हा आहे. या कार्यक्रमामुळे संबंधित व्यक्तींना दैनंदिन जीवनातील व्यवहार अधिक सक्षमपणे करता यावेत, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढावा आणि स्वावलंबनाची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू आहे.

या चाचणीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच स्वयंसेवक यांनी समन्वय साधला आहे. नोंदणीकृत सर्व परीक्षार्थींनी रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी निर्धारित वेळेत आपल्या संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून मूल्यमापन चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, नाशिक श्रीमती सरोज जगताप यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande