
परभणी, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।
सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर अनावश्यक वेळ वाया न घालवता पुस्तकांच्या सहवासात रमावे आणि वाचन संस्कृती आत्मसात करावी, असे प्रतिपादन जिंतूरचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते सचिन ऊर्फ मुन्ना गोरे यांनी केले.जिंतूरचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक कन्या शाळेत विद्यार्थिनींना अभ्यासक्रमाबाहेरील पुस्तकांची भेट देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना विविध विषयांची पुस्तके वाचण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने या ग्रंथालयाचे उद्घाटन गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष गोविंद थिटे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे शहराध्यक्ष विलास भंडारे, शहर उपाध्यक्ष राजेश राठोड, अब्दुल रहेमान लाडले, जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख शकील अहमद, शिक्षणतज्ज्ञ एम. के. कादरी, राहील खान आणि जम्मू खान उपस्थित होते. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थिनींना कथा, चरित्रे, विज्ञान, इतिहास, सामान्यज्ञान आणि प्रेरणादायी साहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या ज्ञानकक्षा विस्तारण्यासोबतच त्यांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या स्तुत्य उपक्रमासाठी सय्यद बापू आणि सय्यद वसीम यांनी पुढाकार घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सिराजुल हसन यांनी केले, एम. के. कादरी यांनी प्रास्ताविक केले, तर सय्यद नसीर ऊर्फ बापू यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका फहमीदा, शिक्षक खालील, आमेर, शेख मोविन, सय्यद मुसद्दिक, रेहान लाडले, सय्यद वसीम बापू, राहत यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis