ठाणे महापालिकेतर्फे 27 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
ठाणे, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 27 ऑक्टोबर 2026 रोजी जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच 3 नोव्हेंबर 2026रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात येणार असून, या मोहिमेद्वारे 1
ठाणे महापालिकेतर्फे 27 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम


ठाणे, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 27 ऑक्टोबर 2026 रोजी जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच 3 नोव्हेंबर 2026रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात येणार असून, या मोहिमेद्वारे 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत.

बालकांचे आरोग्य, पोषणविषयक स्थिती, शिक्षणाची संधी आणि जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका, शासकीय अनुदानित, खासगी अनुदानित शाळा तसेच अंगणवाडी केंद्रांमध्ये दाखल असलेल्या आणि शाळेत न जाणाऱ्या बालकांपर्यंतही ही मोहीम पोहोचविण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, पंचायत राज मंत्रालय आदींचा सहभाग आहे.

जंतांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने अस्वच्छता आणि मातीच्या संपर्कातून होतो. दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे जंतांचा संसर्ग होऊ शकतो. राउंड वर्म, व्हिप वर्म आणि हुक वर्म या प्रकारच्या जंतांमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जंतांचा प्रादुर्भाव झालेल्या मुलांमध्ये कुपोषण व रक्तक्षय होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ आणि मानसिक विकास प्रभावित होऊ शकतो.

या मोहिमेंतर्गत 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांना अल्बेंडाझोल ही जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. 1 ते 6 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना अंगणवाड्यांमधून, तर 6 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांना महापालिका शाळा, शासकीय अनुदानित शाळा, खासगी अनुदानित शाळा, आश्रमशाळा तसेच महानगरपालिका क्षेत्रातील इतर शाळांमधून गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वच्छतेचे आवाहन

जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उघड्यावर शौचास बसू नये, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छ पाण्याने फळे व भाज्या धुवून मगच खाव्यात, नेहमी स्वच्छ पाणी प्यावे, खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावेत, नखे स्वच्छ व नियमित कापलेली ठेवावीत, पायात बूट किंवा चप्पल घालावी तसेच जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात धुवावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

27 ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी घेता न आलेल्या लाभार्थ्यांना 3 नोव्हेंबर 2026 रोजी मॉप-अप दिनी गोळी घेता येणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळी देण्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी केले आहे.

“जंतांपासून मुक्त होतील मुले, सशक्त होतील मुले! आपल्या अमूल्य सहकार्याचा आधार, करी जंतांस हरवणार!” या संदेशातून महापालिकेने नागरिकांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande