राजस्थानात भीषण अपघात; नाशिकच्या तीन भाविकांचा मृत्यू, 25 जण जखमी
राष्ट्रीय महामार्ग-48 वर मिनी बस आणि ट्रेलरची धडक जयपूर, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : राजस्थानच्या जयपूरजवळील बगरू येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर मिनी बस आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नाशिक येथील 3 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे 25 जण
जयपूर येथील अपघातानंतरचे छायाचित्र


राष्ट्रीय महामार्ग-48 वर मिनी बस आणि ट्रेलरची धडक

जयपूर, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : राजस्थानच्या जयपूरजवळील बगरू येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर मिनी बस आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नाशिक येथील 3 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे 25 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त मिनी बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी सात जणांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मिनी बस खाटू श्याम मंदिरातून सालासरच्या दिशेने जात होती. जयपूरपासून सुमारे 20 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या बगरू परिसरात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. मिनी बसने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना वाहनाची धडक बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती रात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास मिळाल्याचे तपास अधिकारी लालाराम यांनी सांगितले. माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाला सतर्क केले आणि घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी पोहोचल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यावर सर्वत्र वाहनांचे तुकडे आणि मलबा विखुरलेला होता. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली.

तपास अधिकारी लालाराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर मिनी बसचा चालक घटनास्थळी आढळून आला नाही. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात होताच चालक वाहनातून उडी मारून पळून गेला. या घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेत 3 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवण्यात आले असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. सुमारे 25 जखमींपैकी 7 जणांना पुढील उपचारांसाठी जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात हलवण्यात आले आहे.खाटू श्याम आणि सालासर या धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिकमधील भाविकांवर या अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची नेमकी कारणे आणि फरार चालकाबाबतची माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

-------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande