
आंध्र प्रदेश, ओडिशासह अनेक राज्यांना अतिवृष्टीचा इशारा
चक्रीवादळ २६ ऑक्टोबरपर्यंत विकसित होण्याची शक्यता
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : बंगालच्या उपसागरात २६ ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संभाव्य चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी हवामान प्रणाली तीव्र होण्याची शक्यता आहे. तिच्या प्रभावामुळे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. २८ ऑक्टोबर रोजी ओडिशा आणि तेलंगणामध्येही काही भागांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.ओडिशामध्ये २७ आणि २९ ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, २८ ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील आणि सखल भागांतील नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भारतात पाऊस
अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप तसेच आसपासच्या भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. २४ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे २४ व २५ ऑक्टोबर रोजी, तर केरळ आणि माहे येथे २५ व २६ ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लक्षद्वीप, कर्नाटक आणि रायलसीमा परिसरात ३० ऑक्टोबरपर्यंत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह वादळी पावसाची शक्यता आहे.
बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्येही पावसाचा अंदाज
पूर्व भारतातील बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये या काळात ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे.ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्येही २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान जोरदार पाऊस आणि वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदमान-निकोबार बेटांवर २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मध्य भारत आणि उत्तर प्रदेशातही पावसाची शक्यता
विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये २८ व २९ ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मध्य प्रदेशात २९ आणि ३० ऑक्टोबरदरम्यान अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
पूर्व उत्तर प्रदेशात २९ व ३० ऑक्टोबर रोजी व्यापक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये २५ ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे.दरम्यान, कोकण आणि गोवा परिसरात २४ ऑक्टोबर रोजी उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील हवामान प्रणालींमुळे पुढील काही दिवस देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या ताज्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे. मुसळधार पावसाच्या काळात सखल भागांत जाणे, पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे आणि वादळी वाऱ्यांच्या वेळी उघड्या जागेत थांबणे टाळावे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी