कानडींना डावलल्यास आयटी कंपन्यांवर कठोर कारवाई : डी. के. शिवकुमार
बेंगळुरूमधील भेदभावाची सरकारकडून गंभीर दखल सोशल मीडियावरील व्हिडीओनंतर उपमुख्यमंत्र्यांचा इशारा बेंगळुरू, 25 ऑक्टोबर (हिं.स.) : कर्नाटकातील आयटी कंपन्यांकडून नोकरीच्या संधी देताना कन्नड भाषिक उमेदवारांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचे आढळल्यास
डी.के. शिवकुमार, मुख्यमंत्री कर्नाटक


बेंगळुरूमधील भेदभावाची सरकारकडून गंभीर दखल

सोशल मीडियावरील व्हिडीओनंतर उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

बेंगळुरू, 25 ऑक्टोबर (हिं.स.) : कर्नाटकातील आयटी कंपन्यांकडून नोकरीच्या संधी देताना कन्नड भाषिक उमेदवारांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचे आढळल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला आहे. स्थानिक कन्नड भाषिकांचे हक्क, सन्मान आणि रोजगाराच्या संधींकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवकुमार यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. बेंगळुरूमधील आयटी कंपन्यांमध्ये कन्नड भाषिकांना नोकरीच्या संधींपासून वंचित ठेवले जात असल्याचे ऐकून दुःख होत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक उमेदवारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.बेंगळुरू हे जागतिक स्तरावरील महत्त्वाचे तंत्रज्ञान केंद्र असून, राज्यातील स्थानिक मनुष्यबळाची क्षमता आणि गुणवत्ता यांचा सरकारला अभिमान आहे, असे शिवकुमार यांनी म्हटले. मात्र, कन्नड भाषिक उमेदवारांशी जाणीवपूर्वक भेदभाव करणाऱ्या कंपन्यांविरोधात सरकार आवश्यक ती कारवाई करू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. कन्नड भाषिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित तरुणीने आयटी कंपन्यांमधील भरती प्रक्रियेत कन्नड भाषिक उमेदवारांशी भेदभाव होत असल्याचा आरोप केला आहे. तेलुगू आणि तमिळ भाषिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाते, तर अर्जदाराच्या बायोडेटामध्ये कन्नड भाषेचा उल्लेख असल्यास त्याचा अर्ज कथितरीत्या नाकारला जातो, असा दावा तिने केला आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande