
अहमदाबाद, 26 ऑक्टोबर (हिं.स.) 'वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२९'आयोजित करण्याचा मान अहमदाबादला मिळाला आहे. या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी भारताला पहिल्यांदाच मिळाली आहे. चीनमधील निंगबो येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने (IWF) अधिकृतपणे गुजरातची यजमान म्हणून निवड केली. या बैठकीत २०३० च्या जागतिक चॅम्पियनशिपसाठी रशियातील मॉस्को शहराची यजमान म्हणून निवड करण्यात आली. याव्यतिरिक्त, कोसोवोमधील प्रिस्टिना येथे २०२८ ची 'वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप' होणार आहे, तर व्हेनेझुएलातील काराकास येथे २०२८ ची 'वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप' आयोजित केली जाईल.
गुजरातने अलीकडेच एका मोठ्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या वर्षाच्या सुरुवातीला गांधीनगरमध्ये 'आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप' पार पडली होती. तसेच, अहमदाबादमध्ये २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजनही केले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनद्वारे (IWF) आयोजित केली जाणारी 'वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप' पहिल्यांदा १८९१ मध्ये सुरू झाली. महिलांसाठीची स्पर्धा १९८७ मध्ये सुरू झाली, तर पुरुष आणि महिलांची संयुक्त स्पर्धा पहिल्यांदा १९९१ मध्ये आयोजित करण्यात आली होती. २०२५ ची स्पर्धा नॉर्वेमधील फोर्डे येथे झाली होती, तर आगामी चॅम्पियनशिप चीनमधील निंगबो येथे २७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.आर्मेनियातील येरेवान येथे २०२७ ची 'वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप' होणार आहे, तर २०२८ च्या स्पर्धेचे यजमानपद व्हेनेझुएलातील काराकासकडे सोपवण्यात आले आहे.
आतापर्यंत भारतीय वेटलिफ्टर्सनी 'वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप'मध्ये एकूण १८ पदके जिंकली आहेत, ज्यामध्ये ३ सुवर्ण, १० रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. कुंजारानी देवी या चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या; त्यांनी १९८९ मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या स्पर्धेत महिलांच्या ४४ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले होते. त्याच स्पर्धेत ललिता पॉली यांनी कांस्य पदक मिळवले होते. कर्णम मल्लेश्वरीने १९९४ आणि १९९५ मध्ये महिलांच्या ५४ किलो वजनी गटात सलग दोनदा जागतिक विजेतेपद पटकावले. अलीकडच्या काळात, ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिने २०१७ मध्ये ४८ किलो वजनी गटात जागतिक विजेतेपद मिळवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे