
क्रांतीबा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याकडे वळून पाहताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे—फुले दांपत्य हे केवळ एका कालखंडापुरते मर्यादित समाजसुधारक नव्हते; तर ते नव्या मानवकेंद्रित युगाचे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि समतावादी मूल्यांचे आद्य प्रणेते होते. बुद्धीप्रामाण्यवाद, निर्भय कृतीशीलता आणि सामाजिक समतेवरील अढळ निष्ठा हा त्यांच्या समग्र जीवनकार्याचा पाया होता. त्यांनी प्रस्थापित शब्दप्रामाण्यवाद आणि ग्रंथप्रामाण्यवादाला स्पष्ट नकार देत, शतकानुशतके चालत आलेल्या विषमतेला आणि शोषक व्यवस्थेला पर्यायी मानवकेंद्रित कृतीशीलतेचे उत्तर दिले. आज आपल्या संविधानात ज्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेचा पाया आहे, त्या संवैधानिक मूल्यांचा हुंकार दीड शतकापूर्वी या महामानवाने आपल्या कार्यातून फुंकला होता.*
*शिक्षणाची समतावादी पहाट आणि स्त्रीमुक्तीचा जागर*
म. फुले यांच्या विचारांचा पाया केवळ व्याख्याने किंवा लेखनापुरता मर्यादित नव्हता, तर त्याला सातत्यपूर्ण कृतीची जोड होती. शिक्षणाशिवाय समाजपरिवर्तन अशक्य आहे हे ओळखून त्यांनी क्रांतीची पहिली मशाल पेटवली. सावित्रीबाईंना स्वतः शिकवून शिक्षिका घडविणे आणि पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणे, हा भारतीय इतिहासातील युगांतर घडवणारा टप्पा होता. समाजाचा दाहक विरोध सहन करत सावित्रीबाईंनी शिक्षणाची ही ज्योत अखंड तेवत ठेवली. अवघ्या चार मुलींवरून अठ्ठेचाळीस विद्यार्थिनींपर्यंत विस्तारलेली ती शाळा केवळ अक्षरओळख देणारी नव्हती; तर ती स्त्रीला विचार करणारी, विवेकनिष्ठ आणि स्वाभिमानी बनवणारी प्रयोगशाळा ठरली. *रूढी-परंपरांच्या अमानुष बंधनांवर थेट घाव*
* केशवपनाच्या अमानुष प्रथेविरोधात लढा: विधवांशी संबंधित केशकर्तन प्रथेला विरोध करण्यासाठी त्यांनी नाभिकांचा ऐतिहासिक संप घडवून आणला. रोजीरोटीशी जोडलेल्या घटकाला एकत्र करून अन्यायाविरोधात उभे करणे, हे त्यांच्या व्यावहारिक व संघटन कौशल्याचे अप्रतिम उदाहरण होते.
* बालहत्या प्रतिबंधक गृह: परित्यक्त आणि संकटात सापडलेल्या बालविधवांना आधार देण्यासाठी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.
* जातीअंताची दृष्टी: त्यांचा लढा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध किंवा जातीविरुद्ध नव्हता, तर विषमतेवर आधारलेल्या व्यवस्थेविरुद्ध होता. भिडे, भांडारकर, चिपळूणकर आणि न्या. रानडे यांच्यासारखे विचारवंत त्यांच्या मित्रपरिवारात होते. विविध धर्मातील, जातीतील सर्वांना बंधू मानून हृदयाशी धरणारा हा विश्वमानव केवळ वर्चस्ववादी मानोजकतेविरुद्ध झुंजत होता.
क्रांतिकारी विचारविश्व: विश्वात्मक जाणिवा आणि 'द रॅडिकल अग्रॅरियन'
महात्मा फुले यांचे वाङ्मयीन योगदान भारतीय विचारविश्वाला नवी दिशा देणारे ठरले. त्यांनी सामान्यांच्या बोलीभाषेत ज्वलंत आणि प्रबोधनपर लेखन केले:
* 'गुलामगिरी' आणि आंतरराष्ट्रीय समतेचा हुंकार: बौद्धिक गुलामगिरी व मानसिक दास्याचे तटस्थ विश्लेषण करणारा हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीय (निग्रो) गुलामांच्या मुक्ती लढ्याला समर्पित केला. शोषितांच्या संघर्षाची जागतिक व्याप्ती ओळखणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन होता. म्हणूनच पुढे नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा यांसारख्या जागतिक नेत्यांना या ग्रंथाची प्रत भेट दिली गेली, तेव्हा या विचारांची वैश्विकता पुन्हा अधोरेखित झाली.
* 'शेतकऱ्याचा असूड': शेतीच्या अवनतीचे, दुष्काळाचे आणि सावकारी पाशाचे व्यवस्थात्मक विश्लेषण करून त्यांनी बळीराजाच्या हक्कांची मांडणी केली.
* 'तृतीय रत्न': आधुनिक मराठी रंगभूमीवरील सामाजिक जाणिवांचे पहिले नाटक लिहून त्यांनी नाट्यक्षेत्रालाही समतेचे साधन बनवले.
राष्ट्रीय स्मृतीचे पुनरुज्जीवन आणि पायाभूत विकासाचे शिल्पकार
इतिहासाने उपेक्षित ठेवलेला फुल्यांचा आणखी एक देदीप्यमान पैलू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे त्यांचे पुनरुज्जीवन कार्य. छत्रपती संभाजी महाराजांनंतर सुमारे दीड-दोन शतके अंधारात गेलेली रायगडावरील शिवरायांची समाधी १८८० मध्ये शोधून काढण्याचे आणि शिवजयंतीचा उत्सव सुरू करण्याचे ऐतिहासिक कार्य महात्मा फुले यांनी केले. त्यांनी शिवरायांवर पहिला पोवाडा रचून त्यांना कुळवाडीभूषण म्हणून लोकमानसात पुन्हा प्रस्थापित केले.
वैचारिक क्रांतीसोबतच फुले यांनी भौतिक विकासातही आपली सचोटी सिद्ध केली. पुणे म्युनिसिपालिटीचे कमिशनर आणि बांधकाम व्यावसायिक असताना त्यांनी साकारलेली कामे आजही तितकीच भक्कम उभी आहेत:
* कात्रजचा जुना बोगदा
* खडकवासला धरण
* बंडगार्डन पूल
समाजाचा प्रत्येक पै अन पै केवळ लोकहितासाठीच वापरला जावा, या नैतिकतेचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या भ्रष्टाचारमुक्त कामातून उभा केला.
सत्यशोधक समाज, 'निर्मिक' आणि सामाजिक वसा
महात्मा फुले यांनी स्थापन केलेला 'सत्यशोधक समाज' ही केवळ एक संघटना नव्हती, तर ती सत्याचा शोध घेणारी, कर्मकांड आणि मध्यस्थांशिवाय जगण्याचा अधिकार देणारी वैज्ञानिक चळवळ होती. त्यांनी मांडलेली निर्मिक ही संकल्पना निसर्गाच्या सर्जनशीलतेला आणि वैश्विक शक्तीला केंद्रस्थानी मानत मानवी एकतेचा पुरस्कार करणारी होती.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेलेल्या सामाजिक न्याय आणि संविधानाच्या लढ्याचा भक्कम पाया महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांच्या बलिदानातून व चिंतनातून रचला गेला. महात्मा फुले हे भूतकाळातील केवळ एक आदरणीय नाव नसून, ते आजच्या आणि उद्याच्याही समताधिष्ठित, विवेकी आणि कल्याणकारी समाजाचे अढळ दिशादर्शक आहेत.
- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर