‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील सुबोध भावे यांच्या राजकीय व्यक्तिरेखेचा लूक चर्चेत
२० नोव्हेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। सत्तेच्या पडद्याआड शिजणारी कटकारस्थाने, राजकारण आणि गुन्हेगारी यांच्यातील अभद्र युती, व्यवस्थेला पोखरणाऱ्या प्रवृत्ती आणि त्यातून उलगडणाऱ्या धक्कादायक रहस्यांचा वेध घेणारा ''महारा
Subodh


२० नोव्हेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। सत्तेच्या पडद्याआड शिजणारी कटकारस्थाने, राजकारण आणि गुन्हेगारी यांच्यातील अभद्र युती, व्यवस्थेला पोखरणाऱ्या प्रवृत्ती आणि त्यातून उलगडणाऱ्या धक्कादायक रहस्यांचा वेध घेणारा 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकीय आणि सामाजिक विश्वातील कथित वादग्रस्त घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुंफलेल्या या वास्तवदर्शी थरारनाट्यात सत्तेचा गैरवापर, गुन्हेगारीचे जाळे आणि न्यायासाठीचा संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरसावलेली यंत्रणा आणि सत्तेच्या बळावर सत्य दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती यांच्यातील संघर्षाची झलक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता अष्टपैलू अभिनेते सुबोध भावे यांनी या चित्रपटात साकारलेल्या महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्तिरेखेचा करारी लूक रिव्हील करण्यात आला आहे. २० नोव्हेंबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाची निर्मिती मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी केली आहे. सामाजिक वास्तवाला रहस्य आणि थराराची जोड देत पडद्यावर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी केला आहे. सत्तेच्या सावलीत दडलेल्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि त्यांना आव्हान देणाऱ्या व्यवस्थेतील संघर्षाला संजय नवगिरे यांनी कथा, पटकथा आणि संवादांच्या माध्यमातून धार दिली असून, चित्रपटाची संकल्पना सागरकुमार एस. जैन यांची आहे. भोंदूबाबाचा पर्दाफाश करणारा हा चित्रपट घोषणेपासूनच विविध कारणांमुळे प्रकाशझोतात राहिला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फर्स्ट लूकमध्ये सुबोध भावे यांचा रुबाबदार आणि करारी अवतार विशेष लक्ष वेधून घेत आहे. पांढराशुभ्र कुर्ता, त्यावर काळ्या रंगाचे बंद गळ्याचे जॅकेट आणि नजरेतील भेदक गांभीर्य यांमुळे सुबोध एका वजनदार, मुरब्बी आणि तत्त्वनिष्ठ राजकीय नेत्याच्या रूपात समोर आले आहेत. 'मंत्री असो की आमदार असो... जो कोणी दोषी असेल, त्याला कायद्याच्या चौकटीत यायलाच लागेल. त्याची गय केली जाणार नाही...' हा त्यांच्या तोंडी असलेला खणखणीत संवाद व्यवस्थेतील गैरप्रवृत्तींना दिलेला निर्वाणीचा इशाराच ठरतो. गुन्ह्याच्या तपासाचे फलक, घटनास्थळाभोवती लावलेल्या पोलिसांच्या पिवळ्या पट्ट्या, पत्रकारांच्या प्रश्नांचा भडिमार, कॅमेऱ्यांच्या प्रकाशझोतांसह विविध पात्रांच्या चेहऱ्यांवरील भीती आणि संशय यांमुळे फर्स्ट लुकमधील गूढ अधिकच गडद झाले आहे. सुबोध यांच्या व्यक्तिरेखेमागे नेमके कोणते राजकीय रहस्य दडले आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटात सुबोध भावे यांच्यासह दीपाली सय्यद, उदय टिकेकर आणि अक्षय टंकसाळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण आणि गुन्हेगारी विश्वातील गुंतागुंतीचे पदर उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटातील रहस्यमय वातावरण, राजकीय घडामोडी आणि नाट्यमय प्रसंगांना कॅमेऱ्यात प्रभावीपणे टिपण्याची जबाबदारी छायाचित्रकार आकाश काकडे यांनी सांभाळली आहे. कथानकातील प्रसंगांना वास्तवाचा स्पर्श देणारी आणि राजकीय तसेच गुन्हेगारी विश्वाचा बाज अधोरेखित करणारी कलात्मक मांडणी कलादिग्दर्शक अक्षय आंबेकर यांनी केली आहे. व्यक्तिरेखांचे स्वभावविशेष, सामाजिक स्थान आणि कथानकातील त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन अपेक्षा गांधी सोनी यांनी वेशभूषेची जबाबदारी पार पाडली आहे. चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेतील विविध विभागांमध्ये समन्वय साधत नियोजनाची धुरा प्रॉडक्शन कंट्रोलर नेहा घोडके यांनी सांभाळली असून, प्रॉडक्शन हेड सचिन घनवट यांनी निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली आहे. लाईन प्रोड्युसर यश सणस आहेत तर विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande