
‘अॅडव्होकेट सरडा’ ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी वेगळी आहे असे म्हणत अभिनेता पुष्कर श्रोत्रींनी त्यांच्या कोण यशवंत पानसरे? मधील भूमिकेमागचे अनुभव अन्सांi मजेदार किस्से सांगितले आहेत.
तुम्ही नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेत शिरताना नेमकं काय वेगळं वाटलं? या व्यक्तिरेखेबद्दल असं काय होतं ज्यामुळे तुम्ही ही भूमिका स्वीकारली?
मी आजवर नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत; मात्र वेब सीरिजमध्ये काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. जेव्हा मी कोण यशवंत पानसरे? ही वेब सीरिज आणि माझी व्यक्तिरेखा ऐकली, तेव्हा या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या माझ्या जवळजवळ सगळ्यांशी माझी ओळख होती. तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे आनंद गोखले यांच्यासारखे दिग्दर्शक आणि कान्हाज मॅजिकसारखी निर्मिती संस्था. या सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे ही भूमिका नाकारण्याचं माझ्याकडे कोणतंच कारण नव्हतं. मी याआधी विनोदी भूमिका खूप केल्या आहेत. रेगेसारख्या चित्रपटातील सचिन वाजेची भूमिका किंवा यंगिस्तानसारख्या चित्रपटातील गंभीर स्वरूपाची भूमिका, असे काही अपवाद वगळता, गंभीर भूमिका माझ्याकडे फार कमी आल्या. त्यामुळे आनंद गोखले आणि कान्हाज मॅजिक यांच्याकडून अशी सशक्त व्यक्तिरेखा आणि इतकी उत्तम वेब सीरिज माझ्याकडे आली, तेव्हा मी कथा आणि व्यक्तिरेखा ऐकल्यानंतर तात्काळ ही भूमिका स्वीकारली.
या भूमिकेसाठी तुम्ही कशी तयारी केली? व्यक्तिरेखेचा प्रवास समजून घेण्यासाठी काही कार्यशाळा झाल्या होत्या का, किंवा तुम्ही दिग्दर्शकांसोबत बराच वेळ चर्चा केली?
आनंद गोखले यांच्यासोबत याआधीही मी अनेकदा गप्पा मारल्या आहेत आणि विविध विषयांवर चर्चा केली आहे. या प्रोजेक्टमध्ये मी असणार की नाही, हा प्रश्न आमच्या दोघांच्याही मनात नव्हता. एखादी कल्पना सुचली, तर आम्ही एकमेकांशी बोलायचो. आमची विचार करण्याची पद्धत आणि आशय निर्माण करण्याची इच्छा यांत साम्य होतं. आनंद गोखले हे सतत काहीतरी नवीन आणि चांगलं कंटेंट निर्माण करण्यासाठी उत्सुक असतात. त्यांची ही धडपड पाहून मला नेहमीच आनंद वाटतो की आपल्यासारखा विचार करणारा माणूस आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत याआधी केलेल्या चर्चा आणि आमच्यात जुळलेली वैचारिक नाळ यांचाही या कामात उपयोग झाला. मात्र, जेव्हा स्क्रिप्ट माझ्या हातात आली, तेव्हा आनंद यांनी मला एक अत्यंत महत्त्वाची सूचना दिली. ते म्हणाले की, अॅडव्होकेट सरडा हा इतक्या मोठ्या स्तराचा वकील आहे की त्याच्या वागण्या-बोलण्यात, चालण्यात किंवा हावभावांमध्ये कोणताही अनावश्यक आविर्भाव नसला पाहिजे. त्याचं व्यक्तिमत्त्व अत्यंत संयत आणि सूक्ष्म असलं पाहिजे. त्याच्या मनात काय चाललं आहे, हे त्याने चेहऱ्यावरून किंवा देहबोलीतून उघड करू नये. मी त्यांच्या या सूचनेचं काटेकोरपणे पालन केलं. प्रत्येक सीन करताना आम्ही चर्चा करायचो की याआधी काय घडलं आहे, पुढे काय घडणार आहे आणि त्या प्रसंगात माझ्या व्यक्तिरेखेची मानसिक अवस्था काय आहे. या सगळ्याचा विचार आनंद यांच्या डोक्यात स्पष्ट होता आणि त्यांनी तो आमच्यापर्यंत पोहोचवला. त्यामुळे व्यक्तिरेखा साकारताना तिची तयारी अधिक नेमकेपणाने करता आली.
चित्रीकरणादरम्यान एखादा कोर्टरूममधला प्रसंग असा होता का, जो तुमच्यासाठी विशेष आव्हानात्मक किंवा कायम लक्षात राहणारा ठरला?
कोर्टरूममधील जवळजवळ सगळेच प्रसंग आव्हानात्मक होते. लेखक आणि संवादलेखकांनी या प्रसंगांसाठी प्रचंड अभ्यास केला होता. पूर्वी भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC होती; आता भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS आहे. त्यातील विविध कलमांचा उल्लेख संवादांमध्ये करायचा होता. एक वकील म्हणून माझ्या व्यक्तिरेखेच्या नसानसांत कायदा भिनलेला असणं आवश्यक होतं. अगदी त्याला झोपेतून उठवलं, तरी त्याला संबंधित कलमं तोंडपाठ असली पाहिजेत, अशी त्या व्यक्तिरेखेची अपेक्षा होती. त्यामुळे मी केवळ संवाद पाठ केले नाहीत, तर ते स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना भारतीय न्याय संहितेतील कोणतं कलम आणि त्यातील कोणती तरतूद वापरली जाते, याची जाणीव ठेवली. लेखकांनी केलेल्या अभ्यासासोबतच मीही काही प्रमाणात अभ्यास केला आणि त्यावर चर्चा केली. या सगळ्यामुळे कोर्टरूममधील प्रसंग नाट्यमय तर झालेच, पण ते तितकेच वास्तववादीही वाटले. त्यामुळे हे प्रसंग साकारताना एक वेगळंच आव्हान आणि समाधान होतं.
ही भूमिका साकारताना सत्य, पुरावे आणि न्याय यांमधला फरक तुम्हाला नव्याने समजला का? किंवा त्याबद्दल वेगळा विचार करायला भाग पाडलं का?
आपण अनेकदा ऐकतो की १९८४ मध्ये झालेल्या दंगलींचा निकाल यायला वेळ लागला किंवा १९९९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालासाठीही बराच काळ गेला. त्यामुळे न्याय मिळायला वेळ लागतो, अशी आपली नेहमीच तक्रार असते. पण या भूमिकेमुळे एक गोष्ट नव्याने समजली की न्याय मिळायला वेळ लागत असला, तरी न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. न्याय देणं हे अत्यंत कठीण काम आहे. न्यायालयासमोर सादर केलेले पुरावे आणि साक्षी तपासून, त्यांची सत्यता सिद्ध झाल्यानंतरच न्याय दिला जातो. त्यामुळे न्यायप्रक्रियेचं महत्त्व मला अधिक प्रकर्षाने जाणवलं. जगामध्ये काही गोष्टी घडत असल्या, तरी हे जग चांगल्या माणसांमुळे चालतं, असं मला वाटतं. पुरावे नष्ट करणारे, असत्याला सत्य म्हणून मांडणारे किंवा गुन्हे करणारे लोक जग चालवत नाहीत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे, सत्याच्या बाजूने उभे राहणारे आणि सत्याची कास धरणारे मोजके लोक या जगाला योग्य दिशेने नेत असतात. त्यामुळे न्याय मिळायला उशीर झाला, तरी शेवटी न्याय मिळतो, हा माझा विश्वास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर