
दुबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.) आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारताची कर्णधार स्मृती मानधना, जिम्बाब्वेविरुद्धच्या अलीकडील दोन सामन्यांत अनुक्रमे ३२ आणि शून्य धावा केल्यामुळे, रँकिंगमधील काही महत्त्वाचे गुण गमावून बसली आहे. भारताची माजी कर्णधार हरमनप्रीत कौर आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचली आहे. तर दीप्ती शर्माने चार स्थानांची प्रगती करत २३ व्या क्रमांकावर झेप घेतली असून, एकदिवसीय अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत ती दोन स्थानांच्या सुधारणेसह चौथ्या क्रमांकावर आली आहे. याव्यतिरिक्त, दीप्ती एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीतही एका स्थानाने वर सरकत आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारतीय संघातील क्रांती गौड हिनेही दोन स्थानांची सुधारणा करत २५ व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
टी-20आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटूंसाठी आनंदाची बातमी आहे. झिम्बाब्वेविरुद्धची मालिका संपल्यानंतर, शफाली वर्मा (एक स्थान वर सरकत तिसऱ्या क्रमांकावर) आणि स्मृती मानधना (एक स्थान वर सरकत चौथ्या क्रमांकावर) यांनी प्रगती केली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील अलीकडील 'ट्रान्स-टास्मन' मालिकेनंतर टी-20 क्रमवारीत आणखी काही बदल दिसून आले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांच्या क्रिकेटपटूंनी विविध श्रेणींमध्ये चांगली कामगिरी करत आपली स्थिती सुधारली आहे.
ॲश गार्डनर टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत नऊ स्थानांची सुधारणा करत १९ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याच वेळी, तिची ऑस्ट्रेलियन सहकारी जॉर्जिया वेअरहॅम (चार स्थानांची सुधारणा करत संयुक्त सातव्या क्रमांकावर) आणि किम गार्थ (पाच स्थानांची सुधारणा करत संयुक्त १० व्या क्रमांकावर) यांनी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे.
न्यूझीलंडसाठी ब्री इलिंग (सहा स्थानांची सुधारणा करत १७ व्या क्रमांकावर) आणि नेन्सी पटेल (२९ व्या क्रमांकावर पोहोचली) यांच्या कामगिरीमुळे दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर या दोघींनीही T20I गोलंदाजांच्या क्रमवारीत आपली स्थानं उंचावली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे