
- अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीला स्थगिती नाही
-
मुंबई, 28 ऑक्टोबर (हिं.स.) - दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. सहकार विभागाने शासन आदेश देखील जारी केला आहे. राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. मदतकार्यावर परिणाम होऊ नये म्हणून निवडणुका थांबवल्याचा सरकारचा दावा आहे.
सहकार विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सदर आदेशामधून सहकारी गृहनिर्माण संस्था, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिलेल्या संस्था, तसेच ज्या संस्थांच्या निवडणुकीतील अर्ज दाखल करण्याचा टप्पा २७ ऑक्टोबर २०२६ पूर्वीच सुरू झालेला आहे, अशा संस्थांच्या निवडणुकांना या स्थगितीतून वगळण्यात आले आहे. सध्या सुरू असलेली अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणुकीत फक्त मतदान बाकी असल्याने या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली नाही.
सध्या दुष्काळग्रस्त भागात महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि जलसंधारण यांसह विविध विभागांवर अतिरिक्त प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दुष्काळी नुकसानीचे पंचनामे, पीक सर्वेक्षण, शेतकऱ्यांना मदत, कर्ज पुनर्गठन, पाणीपुरवठा आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था अशा कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्यास शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत गुंतावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळ निवारण आणि मदतकार्याच्या अंमलबजावणीवर परिणाम होऊ शकतो. तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या सभासदांना सध्याच्या परिस्थितीत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे गैरसोयीचे ठरू शकते, असे शासनाने आदेशात नमूद केले आहे.
राज्यातील सर्व हाऊसिंग सोसायट्यांच्या निवडणुका पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. तसेच हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीलाही स्थगितीतून सूट देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी १९ जागांवर ३०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने ती नियोजित कार्यक्रमानुसार पार पडणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी