

रायगड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। सह्याद्रीतील जंगलतोड आणि प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला सवाल केले. प्रकल्पाची गरज, पर्यावरणीय परिणाम, रोजगारनिर्मिती आणि ग्रामसभांचे अधिकार याबाबत स्पष्टता आणून प्रकल्पाची श्वेतपत्रिका मराठीत प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली.
जंगलतोड झालेल्या ठिकाणी तोडलेली झाडे आणि रचून ठेवलेली लाकडे पाहून दुःख झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. स्थानिकांच्या जीवनाशी निगडित जंगल खासगी प्रकल्पांसाठी नष्ट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वृक्षसंवर्धनविषयक आज्ञापत्राचा दाखला देत त्यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
राज्यातील पंप स्टोरेज प्रकल्पांसाठी १३ हजार ५०० मेगावॅट क्षमता, ७१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ३० हजारांहून अधिक रोजगारनिर्मितीचे दावे करण्यात आले आहेत. या आकडेवारीचा आधार काय, तसेच कर्जत परिसरातील प्रस्तावित तीन हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी पर्यायी जागांचा विचार झाला होता का, अशी विचारणा त्यांनी केली.
आदिवासी क्षेत्रातील ग्रामसभांची संमती, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीची स्थिती आणि प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) मराठीत प्रसिद्ध करण्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. पाणी उंचावर नेण्यासाठी वीज खर्च होत असल्याने प्रकल्पातील ऊर्जा वापराचे गणित आणि निर्माण होणाऱ्या विजेचे वितरण स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
भाषणादरम्यान इंटरनेट सेवा बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी माहितीचा प्रसार रोखण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रकल्पासंबंधीचे दावे आणि पर्यावरणीय परिणामांची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे पडताळणी होणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)