संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या उमेदवारीला लिक्टेनस्टाइनचा पाठिंबा
नवी दिल्ली , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।भारत आणि लिक्टेनस्टाइन यांनी सीमापार दहशतवादासह दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा तसेच एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे. लिक्टेनस्टाइनने २०२८-२९ या कालावधीसाठी संयुक
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या उमेदवारीला लिक्टेनस्टाइनचा पाठिंब


नवी दिल्ली , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।भारत आणि लिक्टेनस्टाइन यांनी सीमापार दहशतवादासह दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा तसेच एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे. लिक्टेनस्टाइनने २०२८-२९ या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.

लिक्टेनस्टाइनचे युवराज एलियास यांच्या भारताच्या राजकीय दौऱ्यादरम्यान जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी मंगळवारी या प्रतिबद्धता व्यक्त केल्या. संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादासह दहशतवाद आणि कट्टरतावादाच्या सर्व प्रकारांचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. तसेच, २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही निषेध केला. या हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति एकजूट व्यक्त करत, या हल्ल्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींना न्यायालयासमोर उभे करण्याच्या महत्त्वावर दोन्ही देशांनी भर दिला.

दहशतवादाला होणारा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक असल्याचे महत्त्वही दोन्ही देशांनी अधोरेखित केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिक्टेनस्टाइनचे आभार मानले.कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) नियमन आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीवर आधारित असावे, यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. युवराज एलियास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय भेटीसाठी लिक्टेनस्टाइनला येण्याचे निमंत्रण दिले.

वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद हाऊस येथे लिक्टेनस्टाइनचे युवराज एलियास आणि युवराणी सोफी यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत उच्चस्तरीय चर्चा झाली. भारत आणि लिक्टेनस्टाइन यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली.परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत व्यापार आणि गुंतवणूक, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कौशल्य विकास तसेच दोन्ही देशांतील नागरिकांमधील परस्पर संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

युवराज एलियास आणि युवराणी सोफी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली. राष्ट्रपतींनी त्यांच्या सन्मानार्थ विशेष भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रपतींनी भारत आणि लिक्टेनस्टाइन यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन, कौशल्य विकास आणि स्वच्छ तंत्रज्ञान या क्षेत्रांत सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande