यूएईकडून कॅप्टन स्मित मच्छार यांना 'फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद द्वितीय' पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी मंगळवारी फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार आणि एफझेड १०७३ या विमानातील संपूर्ण कर्मचारीवर्गाला ‘फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेद द्वितीय’ या
यूएईकडून कॅप्टन स्मित मच्छर यांचा 'फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद द्वितीय' सन्मानाने गौरव


नवी दिल्ली , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी मंगळवारी फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार आणि एफझेड १०७३ या विमानातील संपूर्ण कर्मचारीवर्गाला ‘फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेद द्वितीय’ या सन्मानाने गौरवले.जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना कॅप्टन स्मित मच्छार यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. विमानप्रवासादरम्यान घडलेल्या गंभीर दहशतवादी घटनेच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखवलेले धैर्य आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी हा सन्मान प्रदान केला.

शेख मोहम्मद बिन झायेद यांनी मंगळवारी दुबईचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या उपस्थितीत विमानातील कर्मचारीवर्गाची भेटही घेतली. ३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या एफझेड १०७३ या विमानाच्या कॉकपिटमध्ये गंभीर घटना घडल्यानंतर विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियातील तबूक येथे वळवण्यात आले होते. या घटनेत कॅप्टन स्मित मच्छार जखमी झाले होते. मात्र, विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांनी एकत्रितपणे परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आणि सर्व १७२ प्रवाशांसह विमानातील कर्मचारीही सुखरूप बचावले.या भेटीदरम्यान मान्यवरांनी विमानातील कर्मचारीवर्गाने बजावलेल्या भूमिकेचे आणि दाखवलेल्या धैर्याचे कौतुक केले. प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या उच्च दर्जाच्या जबाबदारीचीही प्रशंसा केली. मानवी जीवनाचे रक्षण आणि बचावकार्य हे संयुक्त अरब अमिरातीच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यापूर्वी, कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर उपचार सुरू असताना शेख हमदान यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी कॅप्टन यांच्या धैर्याचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि मानवी जीवनाचे रक्षण करण्यासाठी दाखवलेल्या समर्पणाचे कौतुक केले होते.संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान शेख हमदान यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये कॅप्टन स्मित मच्छार यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला होता.ते म्हणाले, “कॅप्टन स्मित मच्छार हे आपल्या राष्ट्राच्या गौरवशाली कहाणीचा एक भाग आहेत. फ्लायदुबईचे पायलट म्हणून त्यांनी धैर्य, जबाबदारी आणि मानवी जीवनाप्रती असलेली संवेदनशीलता यांचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे. आमच्या वतीने आणि देशाच्या नेतृत्वाच्या वतीने त्यांना मनःपूर्वक सन्मान आणि कौतुक! ते आमच्या संघाचा भाग आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.”

या घटनेनंतर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग यांनीही कॅप्टन मच्छार यांना ‘नागरी शौर्या’साठी राष्ट्रपती पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. यूएई आणि इस्रायल या दोन्ही देशांकडून मिळणारा हा सन्मान म्हणजे अत्यंत धोकादायक परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कॅप्टन मच्छार यांच्या धाडसाची आणि कर्तव्यनिष्ठेची पोचपावती आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande