यवतमाळ - रेल्वेच्या कामामुळे शेतपिकांचे नुकसान
यवतमाळ 03 ऑक्टोबर (हिं.स.)। उमरखेड तालुक्यातील बेलखेड येथील भूसंपादित शेतजमिनीतून सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रेल्वे मार्गाच्या कामासाठी मोठ्या वाहनांची सुरू असलेली सततची ये-जा, माती व म
रेल्वेच्या कामामुळे शेतपिकांचे नुकसान


यवतमाळ 03 ऑक्टोबर (हिं.स.)।

उमरखेड तालुक्यातील बेलखेड येथील भूसंपादित शेतजमिनीतून सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रेल्वे मार्गाच्या कामासाठी मोठ्या वाहनांची सुरू असलेली सततची ये-जा, माती व मुरूमाची वाहतूक तसेच उडणाऱ्या धुळीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याची व्यथा बेलखेड परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर मांडली आहे. बेलखेड येथील रेल्वे प्रकल्पालगतच्या शेतांमध्ये सध्या ऊस, सोयाबीन, मूग, ज्वारी यासह विविध पिके उभी आहेत. यातील काही पिके काढणीला आली असताना रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांची शेतातून व शेतालगतच्या मार्गावरून सतत वाहतूक सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती थेट पिकांवर साचत आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटत असून उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, रेल्वे प्रकल्पाचा मार्ग शेताच्या मध्यभागातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शेतातील उभे पीक काढणीसाठी तयार झाले असताना शेतात यंत्रसामग्री व वाहने नेण्यासाठी योग्य मार्ग उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. रेल्वे रुळाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी शेतात ये-जा करण्याचा मार्ग अडथळलेला असल्याने आगामी काढणीच्या हंगामात शेतमाल बाहेर काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. रेल्वे प्रकल्पाचे काम विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बसू नये, अशी भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रेल्वे रुळाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी शेतात जाण्यासाठी आणि काढणी झालेला शेतमाल बाहेर आणण्यासाठी रुळालगत तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रेल्वे प्रकल्प प्रशासन व बाधित शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधावा आणि पिकांचे नुकसान तसेच समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा बेलखेड परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande