केशवसृष्टी पुरस्कार स्वाती मोहिते यांना जाहीर
बोरीवलीत शनिवारी होणार पुरस्कार वितरण पेण येथील ‘आई डे केअर’ संस्थेच्या माध्यमातून ७० विशेष मुलांच्या विकासासाठी विनामूल्य कार्य ठाणे, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : समाजातील वंचित आणि विशेष गरजा असलेल्या घटकांच्या विकासासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य कर
श्रीमती स्वाती महेंद्र मोहिते


बोरीवलीत शनिवारी होणार पुरस्कार वितरण

पेण येथील ‘आई डे केअर’ संस्थेच्या माध्यमातून ७० विशेष मुलांच्या विकासासाठी विनामूल्य कार्य

ठाणे, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : समाजातील वंचित आणि विशेष गरजा असलेल्या घटकांच्या विकासासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करणारा केशवसृष्टीचा यंदाचा १७ वा पुरस्कार पेण येथील ‘आई डे केअर’ संस्थेच्या संस्थापिका श्रीमती स्वाती महेंद्र मोहिते यांना जाहीर झाला आहे. विशेष मुलांच्या शिक्षणासाठी, उपचारांसाठी आणि स्वावलंबनासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान सभागृहात होणार आहे.

या समारंभाला सुप्रसिद्ध लेखक, तंत्रज्ञ, उद्योगरत्न आणि समाजसेवक अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आमदार अतुल भातखळकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील, तर केशवसृष्टीचे अध्यक्ष सतीश मोढ समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.

मुलीच्या संगोपनातून समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास

स्वाती मोहिते यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास त्यांची मुलगी चैताली हिच्या जन्मानंतर सुरू झाला. चैताली पाच महिन्यांची असताना तिला बौद्धिक दिव्यांगत्व आणि सेरेब्रल पाल्सी असल्याचे निदान झाले. या परिस्थितीला सामोरे जाताना स्वाती आणि महेंद्र मोहिते यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, पेणसारख्या छोट्या शहरात विशेष मुलांसाठी शाळा उपलब्ध नसल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले.

या अडचणीवर मात करण्यासाठी स्वाती मोहिते यांनी विशेष शिक्षणाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि चैतालीला घरीच शिकवण्यास सुरुवात केली. हळूहळू परिसरातील अन्य पाच-सहा विशेष मुलेही त्यांच्याकडे शिक्षणासाठी येऊ लागली. स्वतःचे शिक्षण पूर्ण करत त्यांनी या कार्याचा विस्तार सुरू ठेवला. २०११ पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या १५ ते २० पर्यंत पोहोचली. जागेची कमतरता भासू लागल्याने शाळेला सात वेळा जागा बदलावी लागली. या काळात श्री. वामन मिरवणकर यांनी संस्थेला स्वतःची जागा मिळेपर्यंत आपला बंगला विनामूल्य वापरण्यास दिला. या सहकार्यामुळे संस्थेच्या कार्याला मोठा आधार मिळाला.

अखेर २०११ मध्ये ‘आई डे केअर’ संस्थेची स्थापना झाली आणि विशेष मुलांच्या शिक्षण व पुनर्वसनाच्या कार्याला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले.

७० विशेष मुलांना विनामूल्य शिक्षण आणि उपचार

आज ‘आई डे केअर’ संस्था परिसरातील तसेच आजूबाजूच्या खेड्यांमधील अत्यंत गरीब कुटुंबांतील सुमारे ७० विशेष मुलांना कोणतीही फी न आकारता शिक्षण आणि प्रशिक्षण देत आहे. संस्थेत मुलांच्या गरजेनुसार शैक्षणिक मार्गदर्शनासोबत फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि अॅक्युप्रेशर थेरपी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

विशेष मुलांना केवळ शिक्षण देण्यापुरते संस्थेचे कार्य मर्यादित नसून, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणही दिले जाते. विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य बससेवा, गणवेश आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. तसेच गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. आर्थिक परिस्थितीमुळे विशेष मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने संस्था सातत्याने कार्यरत आहे.

एका विशेष मुलीच्या शिक्षणासाठी सुरू झालेला हा प्रयत्न आज अनेक विशेष मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरला आहे. वैयक्तिक अडचणींवर मात करून सामाजिक बांधिलकीतून उभ्या राहिलेल्या या कार्याची दखल केशवसृष्टी पुरस्काराच्या माध्यमातून घेतली जात आहे.

प्रत्यक्ष पाहणीनंतर पुरस्काराची निवड

केशवसृष्टी संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार प्रदान केला जातो. सामाजिक कार्यात तरुणांचा सहभाग वाढावा आणि समाजातील दुर्बल, वंचित व गरजू घटकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे.

पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्कारासाठी निवड करताना संबंधित व्यक्ती किंवा संस्थेच्या कार्याची माहिती घेण्याबरोबरच प्रत्यक्ष कार्यक्षेत्राला भेट देऊन कामाची पाहणी केली जाते. स्थानिक नागरिक आणि लाभार्थ्यांशी चर्चा करून कार्याचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेतला जातो. या पारदर्शक निवड प्रक्रियेनंतरच पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती किंवा संस्थेची निवड केली जाते.पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा अमेया जाधव असून समितीमध्ये डॉ. अलका मांडके, डॉ. शुभा राऊळ, डॉ. कविता रेगे, हेमा भाटवडेकर, शुभदा दांडेकर, वैजयंती कुलकर्णी-आपटे, रश्मी भातखळकर, राधा पेठे, अर्चना वाडे, सुनयना नटे, सुनीता तिवारी आणि सीमा उपाध्याय यांचा समावेश आहे. ------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande