
‘ग्रीन काँक्रीट’ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचे आवाहन
नागपूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.) । चांगल्या पायाभूत सुविधांशिवाय गुंतवणूक येत नाही, गुंतवणुकीशिवाय रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत आणि रोजगाराशिवाय गरिबी दूर करता येत नाही. त्यामुळे देशाच्या विकासात मजबूत पायाभूत सुविधांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूटतर्फे (आयसीआय) नागपूर येथे शनिवारी आयोजित ‘Asian Scenario on Infrastructural Development’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयसीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्ही. रामचंद्रा, सिडनी येथील इंटरनॅशनल फेडरेशन फॉर स्ट्रक्चरल काँक्रीटचे (एफआयबी) स्टिफन फोस्टे, आयसीआयचे नियोजित अध्यक्ष मनोज कावलकर आणि महासचिव राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी गडकरी म्हणाले की, नागपूर हे भारताच्या मध्यवर्ती भागात असल्याने आशियातील पायाभूत सुविधांच्या भवितव्यावर चर्चा करण्यासाठी हे शहर अत्यंत उपयुक्त ठिकाण आहे. तंत्रज्ञान हा विकासाचा आधार असून नावीन्यता ही आत्मनिर्भर भारताची ताकद आहे. त्यामुळे शाश्वत, मजबूत आणि परवडणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक देश असून, आगामी काळात आशियातील पायाभूत सुविधांची वाढती मागणी काँक्रीटवर आधारित असेल, असे गडकरी म्हणाले. फ्लाय ॲश, स्लॅग आणि रिसायकल्ड ॲग्रीगेट्सचा वापर करून ‘ग्रीन काँक्रीट’ निर्मितीला चालना दिली जात असून, त्यातून ‘कचऱ्यातून समृद्धी’ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रीकास्ट काँक्रीट आणि जीएफआरपीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बांधकामाचा वेग वाढण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूरमधील इंदोरा चौक ते दिघोरी चौक या सुमारे ९ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलासाठी Ultra High Performance Reinforced Concrete (UHPFRC) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ५० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी झाला असून, पूर्व आणि उत्तर नागपूरदरम्यान सिग्नलमुक्त संपर्क निर्माण झाल्याचे गडकरी यांनी नमूद केले.देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यता आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींचा व्यापक वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी