
सोलापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)।
इजिप्तहून आयात झालेला कांदा भारतीय बाजारात दाखल झाल्याने स्थानिक बाजारातील कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. त्यातच कर्नाटकात झालेल्या पावसामुळे भिजलेला नवीन कांदाही बाजारात दाखल झाला आहे. या दोन्ही कारणांमुळे सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढून दरात घसरण झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
सिद्धेश्वर बाजार समितीत सोमवारी १६ हजार ६६७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ही आवक वाढून १७ हजार १७५ क्विंटलवर पोहोचली. त्यामुळे चार दिवसांत कांद्याच्या आवकेत ५०८ क्विंटलने वाढ झाली.
सोमवारी कांद्याला कमाल ६ हजार रुपये, सरासरी ३ हजार ३०० रुपये आणि किमान ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. शुक्रवारी कमाल दर ५ हजार ५०० रुपयांवर आला. त्यामुळे कमाल दरात ५०० रुपयांची घट झाली.
सरासरी दरातही घट झाली असून तो ३ हजार ३०० रुपयांवरून २ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलवर आला. सरासरी दरात ४०० रुपयांची घट झाली आहे. किमान दर मात्र ५०० रुपये प्रतिक्विंटलवर कायम राहिला.
आवक वाढल्याने तसेच आयातीत आणि नवीन कांद्याचा बाजारातील पुरवठा वाढल्याने दरावर दबाव आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड