
कोलकाता, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।भूतानच्या उत्तर भागात असलेल्या शिंताफू तलावाला अचानक भगदाड पडल्याने परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे लाया परिसरातील एका प्रमुख रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे दुर्गम लाया क्षेत्राचा देशातील इतर भागांशी असलेला संपर्क तुटला आहे.यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
या घटनेनंतर पश्चिम बंगालचे वनमंत्री मनोज कुमार ओरांव यांनी संकोश नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांसाठी खबरदारीचा इशारा जारी केला आहे. कुमारग्राम, चांगमारी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच गरज भासल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मंत्र्यांच्या माहितीनुसार, पुराचे पाणी सध्या या भागांपासून सुमारे ५० ते ६० किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, पाण्याचा प्रवाह खालच्या दिशेने पुढे सरकल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.भूतानमध्येही संवेदनशील भागांत तैनात असलेल्या लष्करी जवानांसह इतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भूतानमध्ये आलेल्या हिमनदीजन्य पुराबाबत उत्तर बंगालचे विकासमंत्री निशीथ प्रमाणिक यांनी सांगितले की, कूचबिहार प्रशासनाने संकोश नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क केले आहे. गरज पडल्यास त्यांना मदतसाहित्यही पुरवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.तलावातून बाहेर पडलेले पाणी मोफू नदीमार्गे संकोश नदीच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे भूतानमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगाल आणि आसाममध्येही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, भूतानमधील ताकत्सेमाखांगजवळ असलेल्या शितांफू त्शो या तलावाला अचानक भगदाड पडले. त्यानंतर गुरुवारी रात्री पुराचे पाणी ताकत्सेमाखांग परिसरात पोहोचले. रात्री अंधार असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचे प्रमाण नेमके किती आहे, याचा अंदाज नागरिकांना घेता आला नाही. मात्र, पाणी वाहण्याचा प्रचंड आवाज ऐकून ही घटना मोठी असल्याचे जाणवत होते, असे स्थानिकांनी सांगितले. या दुर्घटनेत नेमके किती नुकसान झाले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode