न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात आकिब नबीचा समावेश
नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर (हिं.स.)जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीचा न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी संघात हे बदल ज
आकिब नबी


नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर (हिं.स.)जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीचा न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी संघात हे बदल जाहीर केले.

वेगवान गोलंदाज आकिब नबीचा सुरुवातीला मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. आता, निवड समितीने त्याचा पहिल्या तीन सामन्यांसाठीही संघात समावेश केला आहे. या बदलामुळे तो मालिकेच्या सलामीच्या सामन्यापासून भारतीय संघाचा भाग असेल.

पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठीच्या सुधारित भारतीय संघात शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, ईशान किशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी (फक्त पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी) आणि आकिब नबी यांचा समावेश आहे.

मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करेल. संघात रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. याप्रकारे, आकिब नबी आता सर्व पाच एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात उपलब्ध असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande