जळगाव - एसबीआय शाखेत दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा; परिसरात घबराट
जळगाव, 31 ऑक्टोबर, (हिं.स.) जळगाव मधून बँक दरोड्याची खळबळजनक घटना समोर आलीय. जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेत दिवसाढवळ्या अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. पाच ते सहा जणांच्या टोळीने दुचाकींव
जळगाव - एसबीआय शाखेत दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा; परिसरात घबराट


जळगाव, 31 ऑक्टोबर, (हिं.स.) जळगाव मधून बँक दरोड्याची खळबळजनक घटना समोर आलीय. जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेत दिवसाढवळ्या अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. पाच ते सहा जणांच्या टोळीने दुचाकींवरून बँकेत प्रवेश करत कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर बँकेतील रोख रक्कम आणि सोने लुटून नेले. दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापक आणि रोखपालाला मारहाण करून खुर्चीला बांधून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेमुळे भोकर गावासह परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे., शनिवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बँकेत ग्राहकांची वर्दळ कमी असल्याची संधी साधून दरोडेखोरांनी शाखेत प्रवेश केला. अचानक शस्त्रांचा धाक दाखवण्यात आल्याने बँकेतील कर्मचारी भयभीत झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना धमकावत बँकेतील रोकड आणि सोने बॅगांमध्ये भरले.दरोड्यादरम्यान टोळीतील सदस्यांनी बँक व्यवस्थापक आणि रोखपालाला मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही खुर्चीला बांधून ठेवले. इतर कर्मचाऱ्यांनाही शस्त्रांचा धाक दाखवून दहशतीखाली ठेवण्यात आले. लूट पूर्ण केल्यानंतर आरोपी दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले.

दरोडेखोर जळगावच्या दिशेने पळून जात असताना डिकसाई गावाजवळ काही ग्रामस्थांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ग्रामस्थांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता एक आरोपी त्यांच्या ताब्यात सापडला. त्याला ग्रामस्थांनी पकडून ठेवले. याचदरम्यान अन्य ठिकाणी आणखी दोन संशयितांना पकडण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्याकडील बॅगाही हस्तगत करण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या ताब्यातील आरोपीला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. बँकेतील सीसीटीव्ही चित्रण आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बँकेतून नेमकी किती रोख रक्कम आणि किती सोने लुटण्यात आले, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. पकडण्यात आलेल्या संशयितांकडून इतर साथीदारांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जाण्याची शक्यता आहे. भरदिवसा बँकेत झालेल्या या दरोड्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande