
* जग, देशभरातील भाविकांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज, ३५ हजार कोटींची विकासकामे प्रगतिपथावर
नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : सिंहस्थ महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची प्राणशक्ती आणि सामाजिक ऐक्याची अखंड ताकद आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि हिंदू संस्कृतीच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे दर्शन संपूर्ण जगाला घडणार असून, जागतिक पटलावर आपल्या संस्कृतीचा ठसा उमटणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नाशिक येथील रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ध्वजारोहण, ध्वजपूजन सोहळा धार्मिक व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास रामतीर्थावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम आणि गोदा महाआरतीच्या सोहळ्याचे स्वागतपर भाषण करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, जगद्गुरू नरेंद्राचार्य, जगद्गुरू श्री वल्लभाचार्य वल्लभ रायजी महाराज, जगद्गुरू श्री निंबार्काचार्य श्री श्यामशरण देवाचार्यजी महाराज, आदींसह देशभरातील संत, महंत लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होणे हा सिंहस्थ महाकुंभाच्या इतिहासातील सुवर्णक्षण असून एका तपस्वी मातृशक्तीच्या हस्ते या पवित्र धर्मध्वजाचे ध्वजारोहण होणे, हा ऐतिहासिक योग आहे. हा केवळ ध्वजारोहणाचा सोहळा नसून सनातन परंपरेतील आदिशक्तीचा आणि भारताच्या संपूर्ण नारीशक्तीचा सर्वोच्च सन्मान आहे.
शतकानुशतकांच्या परंपरेत आज नवा इतिहास घडला असून नारीशक्तीच्या गौरवाचा ध्वज अधिक उंचावला आहे.
सिंहस्थ महाकुंभाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, हा केवळ धार्मिक विधींचा किंवा उत्सवाचा सोहळा नाही. आपल्या समृद्ध परंपरेचे आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा हा महाउत्सव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेचे मूर्त स्वरूप सिंहस्थ महाकुंभाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या महाकुंभामुळे देशातील विविधतेतून एकतेचा संदेश जगभर पोहोचेल.
आज एकाच वेळी नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर धर्मध्वज फडकविण्यात आला, हा विशेष योग असल्याचेही त्यांनी नमूद केले. परंपरांचा संगम घडवणारा हा सोहळा भक्ती आणि श्रद्धेचा अखंड जागर असल्याचे ते म्हणाले.
कोजागिरी पौर्णिमेला गोदातीरी झालेल्या सामूहिक शंखनादाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सुवर्णाक्षरांनी झाली असून, सिंहस्थ महाकुंभाच्या माध्यमातून नाशिकची ओळख जागतिक स्तरावर अधिक ठळक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
या सिंहस्थ महाकुंभाच्या पर्वकाळात जगभरातून सुमारे १२ कोटी भाविक, साधू-संत आणि यात्रेकरू नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दाखल होतील, असा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या जनसागराच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी महाराष्ट्र शासन सज्ज झाले आहे. या परिसरात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून, ही कामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित राहणार नाहीत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांच्या भविष्यातील विकासाचा भक्कम पाया त्यातून उभा राहणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्याच्या व्यापक सामाजिक आणि आर्थिक महत्त्वाकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, हा महोत्सव संत-महंत आणि भाविकांइतकाच सामान्य कष्टकरी माणसाचाही असला पाहिजे. कुंभमेळ्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे सिंहस्थ महाकुंभ हा श्रद्धेचा उत्सव असण्याबरोबरच सामान्य माणसाच्या हाताला काम देणारा आर्थिक महोत्सवही ठरला पाहिजे.
यावेळी त्यांनी सिंहस्थ महाकुंभ स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श निर्माण करणारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रभू श्रीरामाचे कृपाछत्र आणि गोदावरी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने हा भव्य सोहळा यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी