

नाशिकच्या पावन भूमीवर जनजातीय सिंहस्थ महाआरती; ६५० गावांतील जनजातीय बांधवांचा सहभाग
नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा देशाच्या प्राचीन, सामाजिक आणि अध्यात्मिक परंपरेचा सशक्त आविष्कार असून, या कुंभातून देशाच्या अध्यात्मिक एकतेला आधुनिक आयाम मिळेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी व्यक्त केला.
नाशिकच्या पावन भूमीवर सिंहस्थ कुंभाचा प्रारंभ होत असताना ध्वजारोहणाचा मान मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी गोदावरीच्या पावित्र्याबरोबरच स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. रामतीर्थ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत जनजातीय सिंहस्थ महाआरती व गोदापूजनाचा भव्य सोहळा पार पडला. या सोहळ्यात सुमारे ६५० गावांतील जनजातीय बांधव सहभागी झाले. विविध समाजांतील महिलांनी पौरोहित्य करत गोदावरी मातेची पूजा व महाआरती केली. त्यामुळे हा सोहळा श्रद्धा, स्त्रीशक्ती, सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संगम ठरला. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, ‘‘सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपरा प्राचीन आणि समृद्ध आहे. सुमारे १४०० वर्षांपूर्वीपासून अशा आयोजनाचे उल्लेख आढळतात. कुंभमेळ्यात सहभागी होणे हे भारताच्या अध्यात्मिक एकतेचे प्रमाण आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ देशाच्या महान विरासत आणि जीवनमूल्यांशी जोडणारा ठरेल.’’
नाशिकच्या भूमीचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी प्रभू श्रीरामांचे वास्तव्य, त्र्यंबकेश्वराचे महत्त्व आणि गोदावरीच्या पावित्र्याचा उल्लेख केला. ‘‘गोदावरी मातेचे गंगानदीची मोठी बहीण म्हणून सन्मान केला जातो. तिच्या आशीर्वादाने धन-धान्याची समृद्धी लाभो,’’ अशी प्रार्थनाही त्यांनी केली. नाशिक ही वीरांची आणि समाजसुधारकांची भूमी असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे, दादासाहेब पोतनीस यांचे योगदान अधोरेखित केले. संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिल्याचेही त्यांनी नमूद केले. गोदावरी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन कुंभमेळ्याच्या माध्यमातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे उत्कृष्ट उदाहरण देशासमोर निर्माण करावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. ‘‘स्वच्छता आणि पर्यावरणासाठी आपण जितके प्रयत्न करू तितके कमीच आहेत. देशवासीयांनी पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा,’’ असे त्या म्हणाल्या. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत शेतकरी आणि जनतेच्या सुख-समृद्धीसाठी गोदावरी मातेला प्रार्थना केली.
‘समरसता हाच कुंभाचा पाया’
: फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपतींचे आभार मानत नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये भव्य-दिव्य सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होईल, असा विश्वास व्यक्त केला. सनातन संस्कृती ही शाश्वत असून विविध पूजा-पद्धती, परंपरा आणि संप्रदायांचा संगम म्हणजे कुंभ असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘नाशिक आणि परिसरातील सहा हजार जनजातीय बांधव या महाआरतीत सहभागी होत आहेत, हेच सनातन संस्कृतीचे खरे स्वरूप आहे. समरसता हाच आमचा पाया आहे,’’ असे फडणवीस म्हणाले. सिंहस्थासाठी सुरू असलेली विकासकामे केवळ कुंभापुरती मर्यादित नसून पुढील २५ वर्षांत नाशिकचा चेहरामोहरा बदलणारी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘गोदावरी प्रदूषणमुक्त ठेवणे कर्तव्य’ : राज्यपाल
राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सिंहस्थ हा सनातन संस्कृती आणि आस्थेचे प्रतीक असल्याचे सांगितले. कुंभाच्या माध्यमातून भाषा, समुदाय आणि विविधतेतील भेद दूर होऊन कोट्यवधी भाविक एकत्र येतात. भाविकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून नाशिक शहर स्वच्छ, सुंदर आणि गोदावरी प्रदूषणमुक्त ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. संत-महंत, उद्योग, व्यापार आणि नागरिकांच्या सहभागातून सिंहस्थ यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. नंतर महाआराती झाली.
जगातील सर्वात जुनी सनातन संस्कृती - फडणवीस
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज सिंहस्थ उत्सवाला सुरुवात झाली असून, एक भव्य कुंभमेळा पार पडेल. आपली सनातन संस्कृती शाश्वत आणि अनंत आहे. या संस्कृतीत श्रद्धा आणि विश्वासाचे अनेक प्रवाह एकत्र येतात. हा एक असा महासागर आहे, ज्यात अनेक पंथ, धर्म आणि उपासना पद्धती लहान नद्यांप्रमाणे वाहतात. आपला कुंभ हे या महासागराचेच एक प्रकट रूप आहे आणि त्यात आपल्याला सनातन संस्कृतीचे सर्व नवनवीन आविष्कार पाहायला मिळतात. आपली सनातन संस्कृती आणि विचार हे जगातील सर्वात जुने आहेत.
भारताच्या स्त्रीशक्तीला सर्वात मोठा सलाम - शिंदे
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. राष्ट्रपतींनी या महान उत्सवाचे उद्घाटन केले आहे. सिंहस्थ उत्सवाच्या इतिहासात प्रथमच, एका तपस्वी मातृशक्तीच्या हस्ते हा पवित्र धार्मिक ध्वज फडकवण्याचे ऐतिहासिक सौभाग्य आपल्याला लाभले आहे. त्यामुळे, हा क्षण सिंहस्थाच्या इतिहासातील एका सुवर्ण अध्यायाशी जोडला गेला आहे. हा केवळ एक ध्वजारोहण सोहळा नसून, शाश्वत परंपरेच्या चिरंतन शक्तीला आणि भारताच्या स्त्रीशक्तीला दिलेली एक सर्वोच्च सलामी आहे.
एकाच शुभ मुहूर्तावर धार्मिक ध्वजारोहण - महाजन
राज्य कुंभमेळा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आजचा दिवस केवळ नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक, शुभ आणि अभिमानाचा दिवस आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाशिकमधील पवित्र रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमधील पवित्र कुशावर्त तीर्थ येथे एकाच शुभ मुहूर्तावर धार्मिक ध्वजारोहण केले. या ऐतिहासिक सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चे औपचारिक उद्घाटन झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI