नवरात्रीनिमित्त श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात परिसरात स्वच्छता, दर्शन रांगेतील भाविकांसाठी मंडप !
कोल्हापूर, 04 ऑक्टोबर (हिं.स.) - साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात ११ ऑक्टोबरपासून चालू होणार्‍या नवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात गतीने स्वच्छता करण्यात येत आहे. गेल्या २२ वर्षांपासून हे काम मुंबईच्या ‘आय स्मार्
महालक्ष्मी मंदिर स्वच्छता नवरात्र तयारी


महालक्ष्मी मंदिर स्वच्छता


कोल्हापूर, 04 ऑक्टोबर (हिं.स.) - साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात ११ ऑक्टोबरपासून चालू होणार्‍या नवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात गतीने स्वच्छता करण्यात येत आहे. गेल्या २२ वर्षांपासून हे काम मुंबईच्या ‘आय स्मार्ट’ संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. दर्शन रांगेतील भाविकांचे ऊन, पाऊस यांपासून रक्षण होण्यासाठी भव्य असा मंडप घालण्यात आला आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच आरोग्य विषयक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे वाढत्या भाविकांचा अंदाज घेऊन २ लाख लाडू निर्मितीचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात मंदिराचा बाह्य परिसर आवारातील छोटी मंदिरे, दीपमाळांची स्वच्छता करण्यात येत आहे. ५ ऑक्टोबरला मंदिरातील गर्भगृहाची स्वच्छता करण्यात येणार असल्याने देवीचे मुख्य दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी देवीची उत्सवमूर्ती सरस्वतीमंदिर येथे दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गाभारा स्वच्छता पूर्ण झाल्यावर आरती करून सायंकाळी ६ नंतर देवीचे दर्शन पुन:श्‍च पूर्ववत होईल.

मंदिर परिसरात असलेल्या गरुड मंडपाच्या दुरुस्तीचे काम वेगाने चालू असून नवरात्रीच्या पूर्वी कडीपाटाचे काम (मंडपातील वरील काम) पूर्ण करण्याचा देवस्थान समितीचे मानस आहे.

मंदिरात असणार्‍या निर्माल्यापासून उदबत्ती तयार करण्यात येत असून सध्या ‘चंदन’ गंधाची एकच उदबत्ती सिद्ध करण्यात येत आहे. ३० ग्रॅम उदबत्ती ५० रुपये, तर ६० ग्रॅम उदबत्ती १०० रुपयांना विक्री करण्यात येत आहे. या उदबत्तीला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande