
नाशिक, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।
: मंत्री छगन भुजबळ यांची भेट ही कौटुंबिक स्वरूपाची होती. पितृतुल्य भुजबळ साहेब हे फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे भाष्यकार आहेत. त्यांच्याकडे गेल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याबाबत ज्ञानार्जन करण्याची संधी मिळते. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सातासमुद्रापार कसे पोहोचवले, याविषयी त्यांच्याकडून प्रेरणादायी गोष्टी ऐकायला मिळतात. महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘स्लेव्हरी’ हे पुस्तक अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेट देण्यात आले होते. त्यावेळी ओबामा यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचा प्रसंगही भुजबळ साहेबांकडून ऐकायला मिळतो. अशा प्रेरणादायी आठवणी जाणून घेण्यासाठी ही भेट होती, असे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
भुजबळ साहेबांचा काही दिवसांत ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम व्हावेत, अशी आमच्यासारख्या सामान्यांची भावना आहे. जयश्री यांचेही भुजबळ साहेबांशी संबंध आहेत. मानवाधिकार क्षेत्रात कार्यरत असताना एकमेकांची विचारपूस करण्याच्या भावनेतून ही भेट झाली. आजच्या मोर्चाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्या मोर्चाला ‘गर्जना’ असे नाव देऊन पोस्टरवर त्यांना भावी मुख्यमंत्री दाखवण्यात आले आहे. मात्र, हा मोर्चा केवळ दिखावा असून, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न मृगजळासारखे आहे. हा मोर्चा म्हणजे थोतांड आहे, अशी टीका ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली. मात्र, या पवित्र मंदिरस्थळी यापेक्षा अधिक बोलणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI