पुढील ५-१० वर्षांत भारत जागतिक शक्तींच्या क्रमवारीत वेगाने वर जाणार -एस.जयशंकर
नवी दिल्ली , 04 ऑक्टोबर (हिं.स.)। पुढील पाच ते दहा वर्षांत भारताकडे जागतिक शक्तींच्या क्रमवारीत वेगाने वर जाण्याची क्षमता आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. आगामी दशकांमध्ये वेगवान आर्थिक विकास, अनुकूल लोकसंख्यात्मक रचना आणि नव्
पुढील ५-१० वर्षांत भारत जागतिक शक्तींच्या क्रमवारीत वेगाने वर जाणार -एस.जयशंकर


नवी दिल्ली , 04 ऑक्टोबर (हिं.स.)। पुढील पाच ते दहा वर्षांत भारताकडे जागतिक शक्तींच्या क्रमवारीत वेगाने वर जाण्याची क्षमता आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. आगामी दशकांमध्ये वेगवान आर्थिक विकास, अनुकूल लोकसंख्यात्मक रचना आणि नव्या आर्थिक संधींचा उदय यामुळे भारताला मोठी झेप घेता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

रविवारी दिल्लीत झालेल्या ‘म्युनिक लीडर्स मीटिंग’मध्ये जयशंकर यांना पुढील पाच ते दहा वर्षांत जागतिक व्यवस्थेत भारताचे स्थान काय असेल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले की, सध्या ‘मध्यम शक्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व देशांचा भविष्यातील प्रवास एकसारखा असेलच असे नाही. काही देश मध्यम शक्तींच्या पातळीवर राहतील, तर काही ‘उच्च मध्यम शक्ती’ म्हणून पुढे येतील.

भारताबाबत बोलताना जयशंकर यांनी सांगितले की, देशासमोर वेगवान आर्थिक विकासाची अनेक दशके आहेत. भारताची लोकसंख्यात्मक रचना हा विकास कायम राखण्यास मदत करू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताला यापूर्वीच्या अर्थव्यवस्थांनी स्वीकारलेल्या पारंपरिक औद्योगिकीकरणाच्या मार्गावरच चालण्याची गरज कदाचित भासणार नाही, असेही जयशंकर यांनी नमूद केले. वेगाने बदलणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेत नव्या संधी निर्माण होत असून, त्यांचा भारताला फायदा घेता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

जयशंकर म्हणाले, “आजचे जग पूर्वीपेक्षा अधिक सर्जनशील झाले आहे. येथे अनेक नव्या शक्यता निर्माण होत आहेत. त्यामुळे आपल्याला औद्योगिकीकरणाच्या जुन्याच मार्गावर चालण्याची आवश्यकता नाही.”जागतिक शक्तींच्या क्रमवारीत होणारा बदल सर्व देशांसाठी समान स्वरूपाचा नसेल, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. सध्या ‘मध्यम शक्ती’ म्हणून एकत्र गणल्या जाणाऱ्या देशांचा भविष्यातील प्रवास वेगवेगळ्या दिशेने होऊ शकतो.

“मध्यम शक्तींमधील काही देश पुढे जातील, काही सध्याच्या स्थितीतच राहतील, तर काही कदाचित थोडे मागे पडतील. हीच वस्तुस्थिती आहे. जागतिक व्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा हा एक भाग असेल,” असे जयशंकर यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande