अमित शाहांचा व्हिडीओ शेअर करत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची एसआयआर विरोधकांवर टीका
डोंबिवली, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काढण्यात आलेल्या ‘गर्जना मोर्चा’ला प्रत्युत्तर
sir process ravindra chavan thackeray brothers garjana morcha


डोंबिवली, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काढण्यात आलेल्या ‘गर्जना मोर्चा’ला प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एसआयआर प्रक्रियेबाबत मांडलेल्या भूमिकेचा विशेष व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत ठाकरे बंधूंसह एसआयआरला विरोध करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.

एसआयआर प्रक्रियेला विरोध करण्यापूर्वी विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी उपस्थित केलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान रविंद्र चव्हाण यांनी दिले. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे, हे घुसखोरांनी ठरवायचे का? तसे झाल्यास देशातील लोकशाही सुरक्षित राहील का, असा सवाल त्यांनी केला. तसेच एका मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करण्याची मुभा असावी का आणि मृत्यू पावलेल्या नागरिकांची नावे मतदार यादीत असावीत का, असे आणखी दोन प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले.

विरोधकांनी या प्रश्नांची उत्तरे न देता केवळ राजकीय फायद्यासाठी एसआयआर प्रक्रियेला विरोध करू नये, असा टोला चव्हाण यांनी लगावला. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप आणि ठाकरे बंधू यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चावर भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनीही जोरदार टीका केली. हा मोर्चा म्हणजे कोणतीही ‘गर्जना’ नसून केवळ राजकीय ‘कोल्हेकुई’ असल्याची बोचरी टीका शेलार यांनी केली. त्यामुळे एसआयआरच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात मतदार याद्यांचे पुनरीक्षण हा राज्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande