

रायगड, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड किल्ल्यावर आलेल्या ३७ वर्षीय सुयोग सुरेश पांचाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी किल्ल्यावर आल्यानंतर ते टकमक टोक परिसरातून बेपत्ता झाले होते. रविवारी सकाळी ड्रोनच्या सहाय्याने शोध घेत असताना किल्ल्याच्या दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
सुयोग पांचाळ (वय ३७) हे मूळचे बीजघर, खेड, जिल्हा रत्नागिरी येथील असून सध्या ठाण्यातील रामनगर, वागळे इस्टेट येथे वास्तव्यास होते. शनिवारी पहाटे ते रायगड किल्ल्यावर आले होते. किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांनी आपले आर्टिगा वाहन उभे केले आणि पायरी मार्गाने गडावर प्रवेश केला.
सकाळी साडेसातच्या सुमारास ते टकमक टोक परिसरात पोहोचल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे भाऊ सुवेल पांचाळ रायगडावर दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला. त्यानंतर महाड तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली.
रात्रीच्या अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती. रविवारी सकाळी पोलिस, रेस्क्यू पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. ड्रोनच्या सहाय्याने दरीत शोध घेत असताना सुयोग यांचा मृतदेह दिसून आला.
दरीची खोली आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मृतदेह बाहेर काढण्याचे काम आव्हानात्मक ठरत आहे. रेस्क्यू पथकाकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत नेवसे यांच्या उपस्थितीत पुढील कार्यवाही सुरू असून, घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने सुयोग यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रायगड किल्ल्यावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)