राज्यात काही भागांतून मान्सूनची माघार; २० जिल्ह्यांत पावसाची तूट
मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळसदृश स्थिती; सोलापूरमध्ये ५८ टक्के पावसाची कमतरता मुंबई, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. दरम्यान, राज्यातील ३६ पैकी २० जिल्ह्यांमध्ये सरासर
Monsoon Retreats Many Parts MH 20 Districts Experience Rainfall Deficit


मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळसदृश स्थिती; सोलापूरमध्ये ५८ टक्के पावसाची कमतरता

मुंबई, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. दरम्यान, राज्यातील ३६ पैकी २० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवारी ही माहिती दिली. पावसातील मोठ्या तुटवड्यामुळे राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीच राज्य सरकारने ७० टक्क्यांहून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, कमी पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे.

राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतल्यास, पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी, कोल्हापूर, धुळे, बुलढाणा, जळगाव, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत सरासरीच्या आसपास पाऊस झाला आहे. मात्र, उर्वरित अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे.

मराठवाड्यातील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा ३४ ते ४९ टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ५८ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर बीडमध्ये ५१ टक्के, हिंगोलीत ४९ टक्के, जालन्यात ४८ टक्के, अहिल्यानगरमध्ये ४६ टक्के आणि धाराशिवमध्ये ४५ टक्के पावसाची कमतरता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. सिंधुदुर्गमध्ये ३६ टक्के, साताऱ्यात २८ टक्के आणि सांगलीत २४ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.

दरम्यान, मान्सूनने उत्तर भारतातील उर्वरित काही भागांसह गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील काही भागांतून माघार घेतली आहे. मान्सूनच्या परतीची रेषा सूपौल, रांची, रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हरनाई या भागांतून जात आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित भागांतूनही मान्सूनची माघार कशी होते, याकडे हवामान विभागाचे लक्ष आहे.

हवामानशास्त्रीय निकषांनुसार, एखाद्या भागात सलग पाच दिवस पाऊस पूर्णपणे थांबणे, वातावरणातील आर्द्रतेत लक्षणीय घट होणे आणि जमिनीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवरील वाऱ्यांच्या दिशेत बदल होणे, या बाबींचा विचार करून मान्सूनच्या माघारीची घोषणा केली जाते. राज्यात पावसाची तूट कायम असल्याने आगामी काळात रब्बी हंगाम, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि शेतीवरील परिणाम याबाबत चिंता वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande