पॅरामाउंट सिंटेक्सच्या आयपीओला संस्थात्मक गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद
मुंबई, ४ ऑक्टोबर (हिं.स.) : वस्त्रोद्योग क्षेत्रातील पॅरामाउंट सिंटेक्स लिमिटेडच्या (Paramount Syntex Ltd.) 81.79 कोटींच्या एसएमई आयपीओला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 30 सप्टेंबरला खुला झालेला हा इश्यू दुसऱ्याच दिवशी पूर्णपणे स
Paramount Syntex


मुंबई, ४ ऑक्टोबर (हिं.स.) : वस्त्रोद्योग क्षेत्रातील पॅरामाउंट सिंटेक्स लिमिटेडच्या (Paramount Syntex Ltd.) 81.79 कोटींच्या एसएमई आयपीओला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 30 सप्टेंबरला खुला झालेला हा इश्यू दुसऱ्याच दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.29 वाजेपर्यंत आयपीओला एकूण 1.32 पट बोली मिळाली होती. यामध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला असून, अँकर गुंतवणूकदारांचा हिस्सा वगळता संस्थात्मक श्रेणीला तब्बल 119.29 पट मागणी मिळाली.

पॅरामाउंट सिंटेक्सने आयपीओसाठी प्रति शेअर 119 ते 127 रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे. कंपनी 64.40 लाख नवीन इक्विटी शेअर्स जारी करून सुमारे 81.79 कोटी उभारणार आहे. या इश्यूमध्ये कोणताही ऑफर फॉर सेल नसल्याने उभारलेला निधी कंपनीच्या व्यवसायवाढीसाठी वापरला जाणार आहे. आयपीओ 6 ऑक्टोबरला बंद होणार आहे.

संस्थात्मक श्रेणीत जवळपास 100 कोटींच्या बोली संस्थात्मक श्रेणीसाठी उपलब्ध असलेल्या 66 हजार शेअर्सच्या तुलनेत तब्बल 78.73 लाख शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली. या बोलींचे मूल्य जवळपास 100 कोटी असल्याचे कंपनीने सांगितले. एकूण नेट इश्यूतील सुमारे 61.17 लाख शेअर्सच्या तुलनेत 80.56 लाख शेअर्ससाठी बोली नोंदवण्यात आली.

आयपीओचा अनधिकृत ग्रे मार्केट प्रीमियम सध्या सुमारे 52 प्रति शेअर असल्याचे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. मात्र प्रीमियम हा अधिकृत किंवा नियंत्रित बाजारातील संकेतक नसल्याने त्यात लिस्टिंगपूर्वी बदल होऊ शकतो.

किमान गुंतवणूक 2.54 लाख

आयपीओचा लॉट आकार 2,000 शेअर्सचा आहे. त्यामुळे 119 रुपये या किमान किंमतीनुसार गुंतवणूकदारांना किमान 2.38 लाख, तर 127 या उच्च किंमतीनुसार 2.54 लाख गुंतवावे लागतील. शेअर्सची बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्टिंग प्रस्तावित असून सौभाग्य कॅपिटल ऑप्शन लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आणि बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडहे रजिस्ट्रार आहेत.

मशिनरी खरेदीसाठी 61.68 कोटी

आयपीओमधून मिळणाऱ्या निधीतील सुमारे 61.68 कोटी मशिनरी खरेदीसाठी वापरण्याची कंपनीची योजना आहे. विद्यमान उत्पादन केंद्रांमध्ये यंत्रसामग्री वाढवून उत्पादन क्षमता मजबूत करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

दरम्यान, आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीच्या आर्थिक कामगिरीत सुधारणा झाली. महसूल 112.42 कोटींवरून 122.03 कोटींवर, तर निव्वळ नफा 6.73 कोटींवरून 13.87 कोटींवर पोहोचला. इबिटा देखील 13.17 कोटींवरून 23.59 कोटींवर वाढला.

1996 मध्ये स्थापन झालेली पॅरामाउंट सिंटेक्स अॅक्रेलिक, पॉलिस्टर, लोकर, नायलॉन तसेच विविध ब्लेंडेड यार्नचे उत्पादन करते. लुधियाना येथील उत्पादन सुविधांमधून कंपनी कामकाज करते. पुनर्वापरित अॅक्रेलिक फायबरच्या उत्पादनासह उत्पादन विस्तारावर कंपनीचा भर आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सिंथेटिक आणि ब्लेंडेड यार्नच्या बाजारपेठेत विस्ताराच्या संधी असून, उत्पादन क्षमता आणि ग्राहकवर्ग वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande