


मुंबई, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) विरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. मेट्रो सिनेमा ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विविध विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
मोर्चानंतर झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रिया आणि एसआयआरवरून निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आपल्या भाषणात दोन प्रमुख मागण्या केल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली संपूर्ण एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि पुढील निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर (ईव्हीएम) न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
“आज मला दोन महत्त्वाचे विषय मांडायचे आहेत. पहिला विषय म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली एसआयआर प्रक्रिया संपूर्णपणे रद्द झाली पाहिजे. दुसरी मागणी म्हणजे मतदान बॅलेट पेपरवर झाले पाहिजे,” असे राज ठाकरे म्हणाले. एसआयआरच्या कायदेशीरतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी एसआयआरबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात अवघ्या काही महिन्यांत ४० ते ६० लाख मतदारांची वाढ कशी झाली, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यानंतर एसआयआर प्रक्रियेत सुमारे दोन कोटी मतदारांची नावे वगळली गेल्याचा दावा करत हे मतदार नेमके कोण होते, असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रक्रियेबाबत सर्व राजकीय पक्षांनी प्रश्न उपस्थित करून एसआयआर रद्द करण्याची मागणी करावी, असेही त्यांनी म्हटले.
2017-2018 पासून तुम्हाला हा राज ठाकरे सांगत आला की, याच्यामध्ये चोऱ्या सुरू आहेत. त्यावेळी मी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. ज्याप्रकारे निवडणूक आयोग आणि मतदान यादांमध्ये जो घोळ आहे, त्यावर बोलत होतो. त्यावेळीच मी सांगतो होतो की, निवडणुकीवर बहिष्कार टाका, त्याशिवाय दुध का दुध पाणी का पाणी होणार नाही. हे मी 2017- 2018 पासून सांगतोय की, भारतीय जनता पार्टीचे मत अशी वाढूच शकत नाहीत. इथे जयंत पाटील बसले. त्यावेळी सर्वजण होते, सुरूवातीला त्यांनी हो म्हटले. आता त्यांना समजत आहे की, त्यांना काय सांगत होतो. संपूर्ण बहुमत असे होऊच शकत नाही.असे राज ठाकरे म्हणाले.
भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंना मत मिळाली. राज्यात पूर्ण सन्नाटा असा कोणता विजय असतो.पूर्ण राज्यात लोकांमध्ये उत्साह नाही काही नाही. संपूर्ण बहुतम महायुतीला होते, सर्व सन्नाटा होता.
“कोणत्याही परिस्थितीत मतदान यंत्र बंद झाले पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे. या दोन गोष्टी झाल्या तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्यानंतर सत्ता कोणाचीही आली तरी ती योग्य मार्गाने येईल,” असे राज ठाकरे म्हणाले.
सत्ताधारी पक्ष भविष्यात विरोधी पक्षात गेल्यानंतरही अशाच प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जाऊ शकतो, असा इशारा देत राज ठाकरे यांनी, “आजचा मोर्चा केवळ सत्तेविरोधात नाही, तर देशाचा लोकशाही ढाचा ढासळू नये यासाठी आहे,” असे सांगितले. भविष्यात सत्तेत येणाऱ्या कोणत्याही पक्षाने सत्तेचा गैरवापर केला तर त्याचा परिणाम संपूर्ण व्यवस्थेवर होईल, असेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule