
कोलंबो, 04 ऑक्टोबर (हिं.स.)पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आणि इंग्लंडचाही समावेश असलेल्या आगामी एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेने माजी कर्णधार चरित असलंकाला संघातून वगळले आहे. ८८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४०.५५ ची सरासरी असलेला असलंका, इंग्लंडच्या अलीकडील दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १, ११ आणि ७ अशा धावा केल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले नाही.
फलंदाज अविष्का फर्नांडो आणि अष्टपैलू खेळाडू सहन अराच्चिगे यांचे संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ ने गमावलेल्या संघाच्या तुलनेत यात केवळ हे दोन बदल करण्यात आले आहेत; हे दोघे असलंका आणि वनिंदू हसरंगा यांची जागा घेतील. हसरंगाला इंग्लंड दौऱ्यादरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती.
तिरंगी मालिकेपूर्वी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतूनही असलंकाला वगळण्यात आले होते, त्यानंतर आता त्याला एकदिवसीय संघातूनही वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे, इंग्लंड दौऱ्यावर असलंका संघाचा उपकर्णधार होता आणि नियमित कर्णधार कुसल मेंडिस हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून वेळेत सावरू न शकल्यामुळे त्याने टी-२० सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.
एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ: कुसल मेंडिस (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कामिल मिशारा, पवन रत्नायके, सहन अराच्चिगे, कामिंदू मेंडिस, जानिथ लियानागे, दासुन शनाका, दुनिथ वेल्लालगे, महेश थीक्षणा, सचिंदू कोलंबगे, दुश्मंथा चमीरा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, ईशान मलिंगा.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे