


रायगड, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। ताम्हिणी घाटातील मिल्कीबार वॉटरफॉल येथे मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणाचा खोल कुंडात बुडून मृत्यू झाला. आयुष शिवसिंग नेगी असे मृत तरुणाचे नाव आहे. पाण्यात बेपत्ता झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील दोन रेस्क्यू पथकांनी साडेचार तास शोधमोहीम राबविल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचा मृतदेह कुंडाच्या २५ ते ३० फूट खोलीवर आढळून आला.
आयुष हा पुणे जिल्ह्यातील भुकूम, पिरंगुट येथे वास्तव्यास होता. त्याचे मूळ गाव ऋषिकेश, उत्तराखंड असून तो पुण्यातील पीआयबीएम कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. मित्रांसोबत मिल्कीबार वॉटरफॉल परिसरात फिरण्यासाठी आला असताना तो पाण्यात बेपत्ता झाला.घटनेची माहिती मिळताच एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीम, कोलाडचे लीडर सागर दहिंबेकर तसेच शेलार मामा रेस्क्यू टीम, भिरा-पाटणूसचे मुख्य लीडर प्रकाश शेलार यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू पथके घटनास्थळी दाखल झाली. सायंकाळपासून शोधकार्य सुरू करण्यात आले.
कुंडाची अधिक खोली, पाण्याची परिस्थिती आणि रात्रीचा अंधार यामुळे शोधमोहीमेत अडथळे निर्माण होत होते. मात्र, रेस्क्यू पथकांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास २५ ते ३० फूट खोलीवर आयुषचा मृतदेह आढळून आला. पथकांनी मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, या घटनेमुळे ताम्हिणी घाटातील पर्यटनस्थळांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मिल्कीबार वॉटरफॉल परिसरातील खोल कुंड आणि पाण्याची खोली लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरक्षा व्यवस्था आणि धोकादायक ठिकाणी सूचना फलक उभारण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)