
परभणी, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिंतूर तालुक्यातील पोखर्णीतांडा येथील विठ्ठल देवराव चव्हाण(वय ३५) या युवकाने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळत नाही म्हणून विष प्राशन करून आत्महत्या केली.
महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला इतर राज्यातील आरक्षणाप्रमाणे आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठीचा लढा चालू असताना पोखर्णी तांड्यातील या युवकाने सरकार बंजारा समाजाला न्याय देत नाही म्हणून राहत्या घरी विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यास जिंतूर येथील सरकारी इस्पितळात आणले. परंतु युवकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारार्थ त्याला परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मयत विठ्ठल चव्हाणच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आई आणि वडील असे कुटुंब आहे. मयत विठ्ठल हा भूमिहीन असून मजूरी करून आपली उपजीविका भागवत होता. त्याच्या खिशात चिट्ठी आढळून आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis