शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या हेल्पलाइनवरील कॉलमध्ये वर्षभरात २०.४७ टक्क्यांची वाढ
पुणे, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। सप्टेंबरमध्ये ६,७७२ शेतकऱ्यांनी ‘शिवार’ हेल्पलाइनवर संपर्क साधत आपल्या अडचणी मांडल्या. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाइनवर गेल्या काही महिन्यांत मदतीसाठी संपर्क करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वा
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या हेल्पलाइनवरील कॉलमध्ये वर्षभरात २०.४७ टक्क्यांची वाढ


पुणे, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।

सप्टेंबरमध्ये ६,७७२ शेतकऱ्यांनी ‘शिवार’ हेल्पलाइनवर संपर्क साधत आपल्या अडचणी मांडल्या. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाइनवर गेल्या काही महिन्यांत मदतीसाठी संपर्क करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.

शिवार फाउंडेशनचे संस्थापक आणि राज्य सरकारच्या शेतकरी आत्महत्या प्रतिबंधक कृती दलाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. विनायक हेगाणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये २,५६४, जुलैमध्ये १,५६४ आणि ऑगस्टमध्ये २,७८९ शेतकऱ्यांनी हेल्पलाइनशी संपर्क साधला. सप्टेंबरमध्ये हा आकडा थेट ६,७७२ वर पोहोचला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हेल्पलाइनवर आलेल्या कॉलमध्ये २०.४७ टक्क्यांची वाढ झाल्याचे हेगाणा यांनी सांगितले.

अतिवृष्टी, दुष्काळ, पीकपाण्याची अनिश्चितता आणि कर्जाचा वाढता ताण यामुळे शेतकऱ्यांसमोरील आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्न अधिक गंभीर होत असल्याचे हेल्पलाइनवरील संवादातून समोर येत आहे. मागील पुरामुळे अपेक्षित मदत मिळाली नाही, त्यामुळे यंदा काही शेतकऱ्यांनी पीकविमाही काढला नसल्याचे त्यांनी सांगितले.

यामुळे नैसर्गिक संकटानंतर मिळणारी शासकीय मदतही अपुरी पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जाचे हप्ते आणि पुढील हंगामातील पीकपाण्याची चिंता अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी त्रस्त असल्याचे हेगाणा यांनी स्पष्ट केले.

“सततच्या संकटांमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना सध्या सर्वाधिक गरज आहे ती आधाराची आणि तत्काळ मदतीची,” असे हेगाणा यांनी सांगितले. संकटांच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या समस्यांवर वेळीच मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande