मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार
प्रवासाचा वेळ 16 तासांवर येण्याची शक्यता मुंबई, 05 ऑक्टोबर (हिं.स.) : भारतीय रेल्वे मुंबई ते बंगळूरदरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. रेल्वे बोर्डाकडून या सेवेसंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता असून, या महिन्या
वंदे भारत ट्रेन लोगो


प्रवासाचा वेळ 16 तासांवर येण्याची शक्यता

मुंबई, 05 ऑक्टोबर (हिं.स.) : भारतीय रेल्वे मुंबई ते बंगळूरदरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. रेल्वे बोर्डाकडून या सेवेसंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता असून, या महिन्याच्या अखेरीस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाण्याची संभावना आहे. ही सेवा सुरू झाल्यास मुंबई-बंगळूर प्रवासाचा कालावधी सध्याच्या सुमारे 24 तासांवरून 16 तासांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.

रेल्वे प्रशासनाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते एसकेआर बंगळूर या मार्गावर वंदे भारत स्लीपर सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. प्रस्तावित वेळापत्रकानुसार ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस दोन्ही दिशांनी धावण्याची शक्यता आहे.

तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, केएसआर बंगळूरहून रात्री 10 वाजता सुटणारी ट्रेन दुसऱ्या दिवशी दुपारी 1.50 वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचू शकते. परतीच्या प्रवासात मुंबई सीएसएमटीहून रात्री 10.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1.50 वाजता बंगळूरला पोहोचण्याची शक्यता आहे.मात्र, हे वेळापत्रक अद्याप अंतिम झालेले नसून रेल्वे प्रशासनाकडून त्यात बदल केला जाऊ शकतो.या मार्गावरील संभाव्य थांब्यांमध्ये अनंतपूर, गुंतकल, रायचूर, कलबुर्गी, सोलापूर आणि कल्याण यांचा समावेश असू शकतो.

वंदे भारत स्लीपरमध्ये एकूण 16 प्रवासी डबे असतील. त्यापैकी 11 एसी 3-टियर, चार एसी 2-टियर आणि एक एसी फर्स्ट क्लास डबा असेल. ही ट्रेन ताशी 160 किलोमीटरपर्यंतच्या वेगाने धावण्यासाठी तयार करण्यात आली आहे. चाचण्यांदरम्यान ट्रेनचा वेग ताशी 180 किलोमीटरपर्यंत नेण्यात आला आहे.मात्र, भारतीय रेल्वेच्या अनेक मार्गांवरील पायाभूत सुविधा अद्याप या वेगाने नियमित सेवा चालवण्यासाठी पूर्णपणे सक्षम नसल्याने प्रत्यक्ष प्रवासाचा वेग मार्गाच्या क्षमतेनुसार निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. युरोपियन रेल्वेगाड्यांच्या डिझाइनपासून प्रेरणा घेत वंदे भारत स्लीपरच्या डब्यांमध्ये प्रवाशांच्या आरामासाठी कुशनयुक्त बर्थ देण्यात आले आहेत. वरच्या बर्थवर चढणे सोपे व्हावे, यासाठी बर्थच्या डिझाइनमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.प्रत्येक डब्यात वैयक्तिक रीडिंग लाइट्स, चार्जिंग पॉइंट्स आणि रिफ्रेशमेंट टेबल्स यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. डब्यांच्या आतील भागात जीएफआरपी पॅनेल्सचा वापर करण्यात आला आहे.

‘कवच’सह आधुनिक सुरक्षा व्यवस्था

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या ट्रेनमध्ये देशात विकसित करण्यात आलेली ‘कवच’ अँटी-कॉलिजन प्रणाली बसवण्यात आली आहे. तसेच, ऊर्जा बचतीसाठी रीजेनरेटिव्ह ब्रेकिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.डब्यांदरम्यान स्वयंचलित इंटरकनेक्टिंग दरवाजे देण्यात आले असून, जोडणीचे मार्ग पूर्णपणे सीलबंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ट्रेनमधील स्वच्छ हवा आणि तापमान नियंत्रण राखण्यास मदत होईल.ट्रेनमध्ये सेंट्रलाइज्ड कोच मॉनिटरिंग सिस्टम देखील असेल. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना थेट लोको पायलटशी संपर्क साधता यावा, यासाठी आपत्कालीन संपर्क सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबई-बंगळूरदरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा सुरू झाल्यास या महत्त्वाच्या मार्गावरील रात्रीच्या प्रवासासाठी प्रवाशांना जलद आणि आधुनिक रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र, सेवेची अधिकृत सुरुवात, अंतिम वेळापत्रक आणि भाडे याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

---------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande