एका सेकंदात ५९२ वेळा फिरणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्याचे महाकाय रेडिओ पल्सेस शोधले
जीएमआरटीच्या मदतीने भारतीय शास्त्रज्ञांसह आंतरराष्ट्रीय संशोधकांचे महत्त्वपूर्ण यश पुणे, ५ ऑक्टोबर (हि.स.) : अंतराळातून पृथ्वीवर पोहोचणाऱ्या अत्यंत अल्पकालीन आणि प्रचंड ऊर्जेच्या रेडिओ संकेतांचा वेध घेत भारतीय शास्त्रज्ञांसह भारत, अमेरिका, जर्मनी
प्रतिकात्मक छायाचित्र


जीएमआरटीच्या मदतीने भारतीय शास्त्रज्ञांसह आंतरराष्ट्रीय संशोधकांचे महत्त्वपूर्ण यश

पुणे, ५ ऑक्टोबर (हि.स.) : अंतराळातून पृथ्वीवर पोहोचणाऱ्या अत्यंत अल्पकालीन आणि प्रचंड ऊर्जेच्या रेडिओ संकेतांचा वेध घेत भारतीय शास्त्रज्ञांसह भारत, अमेरिका, जर्मनी आणि युकेमधील खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. पुण्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)च्या साहाय्याने एका वेगाने फिरणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्यातून उत्सर्जित होणाऱ्या अत्यंत तेजस्वी आणि अतिशय कमी कालावधीच्या ‘महाकाय रेडिओ पल्सेस’चा शोध घेण्यात आला आहे.

‘पीएसआर जे १२२७-४८५३’ या न्यूट्रॉन ताऱ्याच्या निरीक्षणातून हा शोध समोर आला असून, या ताऱ्याचा वेग तब्बल एका सेकंदात ५९२ प्रदक्षिणांचा आहे. काही रेडिओ पल्सेस नेहमीच्या पल्सेसपेक्षा तब्बल १० हजार पटींनी अधिक तेजस्वी आढळले. यातील सर्वांत अल्पकालीन पल्स केवळ १.२८ मायक्रोसेकंद इतका होता.

हा अभ्यास ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधनाचे प्रमुख लेखक सप्तर्षी सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ताऱ्याचे निरीक्षण केले. या संशोधनामुळे वेगाने फिरणारे न्यूट्रॉन तारे इतक्या प्रचंड ऊर्जेच्या आणि अत्यल्प कालावधीच्या रेडिओ लहरी कशा निर्माण करतात, याचा अभ्यास करण्यासाठी नवी दिशा मिळाली आहे.

न्यूट्रॉन ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्याची संधी

‘पीएसआर जे १२२७-४८५३’ हा ‘ट्रान्झिशनल मिलिसेकंद पल्सार’ आहे. म्हणजेच तो आपल्या साथीदार ताऱ्याकडून पदार्थ खेचून घेण्याची अवस्था आणि वेगाने फिरणाऱ्या रेडिओ पल्सारच्या अवस्थेदरम्यान स्थित्यंतर करतो. या संक्रमणाच्या टप्प्यात या ताऱ्याचे निरीक्षण करता आल्याने न्यूट्रॉन ताऱ्यांची निर्मिती आणि उत्क्रांती समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांना दुर्मीळ संधी मिळाली आहे.

जीएमआरटीची उच्च संवेदनशीलता, मायक्रोसेकंद पातळीवरील अचूक वेळमापन आणि दीर्घकाळ निरीक्षण मोहिमा राबविण्याची क्षमता या शोधासाठी निर्णायक ठरली.

अशा प्रणालीतून महाकाय रेडिओ पल्सेस शोधण्याची ही जीएमआरटीच्या माध्यमातून झालेली पहिली नोंद असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

“जीएमआरटीच्या उच्च संवेदनशीलतेमुळे आणि मायक्रोसेकंद पातळीवरील वेळेच्या अचूकतेमुळे हा शोध शक्य झाला. या निरीक्षणांमुळे अशा अत्यंत तेजस्वी रेडिओ लहरींच्या निर्मितीमागील प्रक्रियांचा अभ्यास करण्यास मदत होईल,” असे एनसीआरएचे सहयोगी प्राध्यापक आणि अभ्यासाचे सहलेखक जयंता रॉय यांनी सांगितले.

काय असतात न्यूट्रॉन तारे?

न्यूट्रॉन तारे हे महाकाय ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेले अत्यंत घन अवशेष असतात. त्यापैकी अतिशय वेगाने फिरणाऱ्या आणि शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र असलेल्या ताऱ्यांना ‘पल्सार’ म्हटले जाते. हे तारे त्यांच्या चुंबकीय ध्रुवांमधून रेडिओ लहरी उत्सर्जित करतात.

पल्सारचा प्रकाश फिरत्या दीपगृहाच्या प्रकाशाप्रमाणे ठरावीक अंतराने पृथ्वीवर पोहोचतो. या नियमित रेडिओ स्पंदनांच्या आधारे शास्त्रज्ञांना त्या ताऱ्याच्या फिरण्याचा वेग आणि इतर भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करता येतो.

पुण्यातील जीएमआरटी ही राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकशास्त्र केंद्राच्या (एनसीआरए) माध्यमातून संचालित जागतिक दर्जाची रेडिओ दुर्बीण असून, रेडिओ खगोलशास्त्रातील अनेक महत्त्वपूर्ण संशोधनांमध्ये तिची भूमिका राहिली आहे.--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande