
लातूर, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।
: देवणी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होऊनही शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांना अद्याप शासनाकडून अपेक्षित आर्थिक मदत मिळालेली नसल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने बोरोळ चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसीलदार सोमनाथ वाडकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत तातडीने त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, पशुधनासाठी त्वरित चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच जनावरांसह नागरिकांसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्षाची शैक्षणिक फी माफ करावी, शेतमजुरांना तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढून शासनाच्या विविध योजनांतून त्यांना मदत मिळवून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
या निवेदनावर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, जिल्हा सरचिटणीस अँड. अजित बेळकोने, कोषाध्यक्ष वैजनाथ लुल्ले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis