
बीड, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।
वाढीव पाणीपुरवठा योजनेला तातडीने मंजुरी द्या, माजलगावचे पाणी वाण धरणाला लिफ्ट करा, खडका बंधार्यातून पाणी द्या आदी आग्रही मागण्या
दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटातून परळीकरांची कायमची सुटका करण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याची मागणी नगर परिषदेच्या वतीने परळीतील नगरसेवकांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे केली.वाढीव पाणीपुरवठा योजनेला तातडीने मंजुरी द्यावी, माजलगावचे पाणी वाण धरणात लिफ्ट करावे, खडका बंधार्यातून पाणीपुरवठ्यावर प्रशासकीय मंजुरी आदी आग्रही मागण्या करण्यात आल्या.यावर जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
बीड जिल्हाधिकारी जॉन्सन यांच्या परळी दौऱ्यादरम्यान तहसील कार्यालयात झालेल्या भेटीत शहराच्या पाणीप्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परळी शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन दीर्घकालीन पाणीपुरवठ्याचा सविस्तर आराखडा शासनाकडे सादर करावा. तसेच शहरासाठी प्रस्तावित वाढीव पाणीपुरवठा योजनेला तातडीने मंजुरी मिळावी, यासाठी शासनस्तरावर ठोस शिफारस व सातत्याने पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. दरवर्षी टंचाईच्या काळात तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन शाश्वत व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार परळीच्या पाणीप्रश्नाच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत.या अनुषंगाने परळीसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करणे, माजलगाव येथून नागापूर येथील वाण धरणात पाणी लिफ्ट करणे त्याचबरोबर खडका बंधार्यातून परळीसाठी पाणीपुरवठ्यास प्रशासकीय मंजूरी देणे आदी बाबी महत्त्वपूर्ण असुन त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.या मागण्यांवर जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी, बांधकाम सभापती प्रा.पवन मुंडे, जयपाल लाहोटी, दिपक मुंडे, हाजी बाबा,शकील कुरेशी, अझीझ कच्छी, अनंत इंगळे, महेंद्र रोडे,भीमा डावरे,रमेश पवार आदींसह उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, न.प. मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, न.प. पदाधिकारी,अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis