प्रेमसंबंधाच्या संशयातून प्राध्यापकाचा खून; बर्दापूरजवळील खडी केंद्रावर बेदम मारहाण
बीड, 06 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूरमधून अपहरण करून अंबाजोगाई तालुक्यात आणले; चौघांविरुद्ध गुन्हा एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून लातूर येथील प्राध्यापकाचे अपहरण करून अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळील खडी केंद्रावर नेण्यात आले. तेथे लोखं
प्राध्यापकाचा


बीड, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।

लातूरमधून अपहरण करून अंबाजोगाई तालुक्यात आणले; चौघांविरुद्ध गुन्हा

एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून लातूर येथील प्राध्यापकाचे अपहरण करून अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळील खडी केंद्रावर नेण्यात आले. तेथे लोखंडी रॉड, बेल्ट आणि काठ्यांनी बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माधव ऊर्फ नितीन धनाजी संगमे (वय ३२) असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव संगमे हे कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या लहान भावाच्या साखरपुड्याच्या तयारीसाठी ते गावी आले होते. रविवारी दुपारी त्यांना फोन करून लातूर शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात बोलावून घेण्यात आले. तेथून पृथ्वीराज देशमुख, धवल देशमुख, प्रथमेश रेड्डी आणि आदित्य भालके या चौघांनी चारचाकी वाहनातून त्यांचे अपहरण केले.

माधव यांचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच संशयातून त्यांना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील खडी केंद्रावर नेण्यात आले. तेथे आरोपींनी त्यांना लोखंडी रॉड, बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले.

दरम्यान, आरोपी आदित्य भालके याने माधव यांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. माधव हे बर्दापूरजवळ जखमी अवस्थेत आढळल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रुग्णालयात उपस्थित पोलिसांना संशय आल्याने चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी मृताचा भाऊ नरेंद्र संगमे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande