
लातूर, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्र सायबर विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२६’ अंतर्गत लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
लातूर पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
सायबर जनजागृती महिन्याच्या प्रारंभी १ ऑक्टोबर रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचा व्हिडिओ संदेश सोशल मीडिया व स्टेटसच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
२ ऑक्टोबर रोजी सायबर प्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात आला. गांधी जयंतीनिमित्त शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून सायबर हायजीनबाबत शपथ घेण्यात आली. यामध्ये सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
३ ऑक्टोबर रोजी आर्थिक फसवणूक, डिजिटल अफवा, मॉर्फिंग, डीपफेक आदी सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली. महिला व शांतता समितीच्या समन्वय बैठका घेऊन MRM/GRM संदर्भातील व्हिडिओ व पोस्टरच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात आली.
४ ऑक्टोबरपासून MRM जनजागृती अभियानाला प्रारंभ करण्यात आला. हाऊसिंग सोसायटी, गेट-टुगेदर व मॅनेजमेंट कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करण्यात येत असून सोशल मीडियावरही MRM संदर्भातील व्हिडिओ व पोस्टर प्रसारित करण्यात येत आहेत.
तसेच ५ ऑक्टोबर रोजी सायबर फसवणुकीतील पीडितांशी संपर्क साधून, प्रत्येक पोलीस ठाण्याने प्राप्त MRM प्रकरणांपैकी किमान ३० टक्के पीडितांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक मदत व मार्गदर्शन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
६ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या सायबर सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला. ज्येष्ठ नागरिक पार्क, वेल्फेअर असोसिएशन व क्लबमध्ये सायबर जनजागृती करण्यात आली. विशेषतः ‘Digital Arrest’, पेन्शन फसवणूक, ऑनलाइन आर्थिक फसवणूक याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सायबर क्लिनिक व MRM ड्राइव्हच्या माध्यमातून नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येत आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना अनओळखी व्यक्तींना OTP, PIN, CVV, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच ‘Digital Arrest’च्या नावाने घाबरून कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी जागरूकता हीच सर्वात मोठी सुरक्षा असून, ‘सावध नागरिक – सुरक्षित समाज’ या उद्देशाने लातूर पोलिसांची सायबर जनजागृती मोहीम संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात सुरू राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis