केंद्रीय पथकाकडून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी दौरा सुरू
* 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान केंद्रीय पथकाचा महाराष्ट्र दौरा * दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याबाबत राज्य शासनाकडून केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण मुंबई, 08 ऑक्टोबर (हिं.स.) : खरीप हंगाम 2026 मधील दुष्काळी परिस्थिती आ
केंद्रीय पथक दुष्काळ दौरा आढावा


* 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान केंद्रीय पथकाचा महाराष्ट्र दौरा

* दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याबाबत राज्य शासनाकडून केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण

मुंबई, 08 ऑक्टोबर (हिं.स.) : खरीप हंगाम 2026 मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून, पाऊस, पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.

केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल हे या पथकाचे प्रमुख आहेत. केंद्र शासनाच्या कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग आणि अन्य संबंधित विभागांतील प्रशासकीय आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचा पथकात समावेश आहे.

राज्य सरकारकडून दुष्काळी स्थितीचे सविस्तर सादरीकरण

केंद्रीय पथकाच्या मुंबईतील आगमनानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे आज मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी पावसाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील काही भागांत निर्माण झालेली पाणीटंचाई, टँकर्सची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांची स्थलांतराची शक्यता आणि शेतकरी आत्महत्या या बाबींकडे केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले.

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने अपर मुख्य सचिव विनिता वेद-सिंगल यांनी राज्यातील पावसाची स्थिती, अल निनोमुळे हवामान आणि पावसावर झालेले परिणाम तसेच शेतीपिकांच्या नुकसानीची सविस्तर आणि तांत्रिक माहिती दिली. पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबतही सविस्तर आढावा सादर करण्यात आला.

कृषी विभागाच्या वतीने सचिव परिमल सिंह आणि आयुक्त सुरज मांढरे यांनी राज्यातील पिकांच्या नुकसानीची आणि जिल्हानिहाय परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती केंद्रीय पथकासमोर मांडली. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयुक्त डॉ.किरण पाटील यांनी जनावरांच्या चाऱ्याची सद्यस्थिती तसेच आगामी सात महिन्यांसाठीच्या संभाव्य परिस्थितीची माहिती दिली.

पिण्याच्या पाण्याच्या स्थितीचा आढावा

राज्यातील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. सध्या टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा, मागील तीन वर्षांच्या तुलनेतील पाण्याची स्थिती आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गावांची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन तसेच भूजल सर्वेक्षण व विकास आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सादर केली. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, रोजगार हमी योजनेचे सचिव अप्पासाहेब धुळाज यांच्यासह ऊर्जा विभागाच्या वतीने सद्यस्थितीचा आढावा सादर करुन आगामी सात महिन्यातील संभाव्य परिस्थितीची माहिती दिली. यावेळी लघुपाटबंधारे तलाव (एमआय टँक), गावांमधील पाण्याचे स्रोत आणि त्यांची सद्यस्थिती याबाबतही केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली.

प्रत्यक्ष पाहणीसाठी जिल्हे आणि ठिकाणे निश्चित

राज्य सरकारने सादर केलेली आकडेवारी, उपलब्ध पुरावे आणि विविध विभागांकडून मिळालेल्या माहितीची केंद्रीय पथकाने दखल घेतली. या माहितीच्या आधारे दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोणत्या जिल्ह्यांना आणि ठिकाणांना भेटी द्यायच्या, याबाबत नियोजन करण्यात आले.

केंद्रीय पथकातील अधिकारी राज्यातील विविध भागांत जाऊन दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यासाठी विविध पथके तयार करुन जास्तीत जास्त क्षेत्राचा आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाहणीदरम्यान स्थानिक अधिकारी, तज्ज्ञ आणि राज्य शासनाचे संबंधित अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

प्रत्यक्ष पाहणी पूर्ण केल्यानंतर केंद्रीय पथक मुंबईत परतणार असून 11 ऑक्टोबर रोजी दुष्काळी परिस्थितीबाबत पुढील सविस्तर चर्चा करणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळाची वस्तुस्थिती, शेतीपिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती केंद्र सरकारसमोर मांडली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्यासह केंद्रीय पथकातील सदस्य आणि राज्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande