नटसम्राट अनंतात विलीन ; शासकीय इतमामात अखेरचा निरोप
पोलिसांकडून मानवंदना; मान्यवरांची उपस्थिती पुणे, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : दमदार संवादफेक, सहजसुंदर अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना पुण्याजवळील ड
नाना पाटेकर के अंतिम संस्कार का पल


पोलिसांकडून मानवंदना; मान्यवरांची उपस्थिती

पुणे, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : दमदार संवादफेक, सहजसुंदर अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना पुण्याजवळील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी रात्री त्यांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी शोकाकुल वातावरणात मानवंदना देत या ज्येष्ठ कलाकाराला अंतिम सलाम केला.

नानांच्या अंत्यदर्शनासाठी डोणजेत नागरिकांचा अक्षरशः जनसागर उसळला होता.

नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एका कलाकाराचा अंत नव्हे, तर आपल्या अभिनयाने अनेक पिढ्यांच्या मनावर ठसा उमटविणाऱ्या एका समृद्ध अभिनय पर्वाचा अस्त झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी नाना पाटेकर यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचे पार्थिव विमानाने गोव्यातून पुण्यात आणण्यात आले. पुणे विमानतळावरून पार्थिव डोणजे येथील फार्महाऊसवर नेण्यात आले. अंत्यदर्शनासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या कलाकाराला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू होते.

राजकीय, सामाजिक आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती

नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर डोणजे येथे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळ तसेच डोणजे येथे नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, सुनील तटकरे, माधुरी मिसाळ, आमदार गोपीचंद पडळकर, अर्जुन खोतकर, रुपाली चाकणकर, सदाभाऊ खोत आणि उदय सामंत यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.चित्रपटसृष्टीतून मकरंद अनासपुरे, नागराज मंजुळे, नीना कुलकर्णी, प्रवीण तरडे, सुरेश वाडकर, पुरुषोत्तम बेर्डे, सुशांत शेलार आणि लेखक अरविंद जगताप यांच्यासह ‘नाम’ फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संघर्षातून उभा राहिला अभिनयाचा ‘नाना’ अध्याय

नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी मोठा संघर्ष केला. १९७८ मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये विविध छटांच्या भूमिका साकारत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. १९८९ मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी : द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘अपहरण’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाची वेगळी ताकद दाखवून दिली.‘क्रांतिवीर’मधील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरली. तर ‘वेलकम’मधील उदय शेट्टी या व्यक्तिरेखेने त्यांच्या विनोदी अभिनयाची झलकही प्रेक्षकांना दाखवून दिली.

पुरस्कारांनी गौरवलेले ‘नाना’

नाना पाटेकर यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. २०१३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांसाठीही उल्लेखनीय काम केले.नाना पाटेकर यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीने केवळ एक अभिनेता गमावलेला नाही, तर पडद्यावर भूमिका जगणारा आणि पडद्याबाहेरही माणुसकीची जाणीव जपणारा संवेदनशील कलाकार गमावला आहे. त्यांच्या आवाजातील जरब, संवादातील धार, अभिनयातील सहजता आणि व्यक्तिमत्त्वातील अस्सलपणा आता आठवणींचा भाग झाला आहे.

डोणजेच्या मातीने एका महान कलाकाराला अखेरचा निरोप दिला; मात्र नानांचा आवाज, त्यांचा अभिनय आणि त्यांनी साकारलेल्या असंख्य व्यक्तिरेखा रसिकांच्या मनात कायम जिवंत राहतील.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande