
नवी दिल्ली , 08 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय लष्कराने 225 फर्स्ट-पर्सन व्ह्यू (FPV) ड्रोन खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. कठोर मूल्यमापन आणि प्रत्यक्ष मैदानी चाचण्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला. या चाचण्यांमध्ये तब्बल 17,500 फूट उंचीवर या ड्रोनची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
संख्येच्या दृष्टीने हा करार फार मोठा नसला, तरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि एवढ्या मोठ्या उंचीवर या ड्रोनची चाचणी घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याने या कराराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या ड्रोनची सहनशक्ती, अचूकता, वेग आणि उंच पर्वतीय भागात काम करण्याची क्षमता या निकषांवर चाचणी घेण्यात आली.
याचे महत्त्व असे की, चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तसेच पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय जवान 12,000 ते 18,000 फुटांहून अधिक उंचीवर तैनात असतात. हिमालय आणि सियाचीन ग्लेशियरसारख्या भागांमध्ये प्रचंड थंडी आणि कमी ऑक्सिजनमुळे केवळ मानवी कार्यक्षमताच प्रभावित होत नाही, तर पारंपरिक उपकरणांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो.अशा दुर्गम चौक्यांवर रसद आणि आवश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पायदळ जवान, खेचर किंवा जुन्या ‘चीता’ हेलिकॉप्टरवर अवलंबून राहावे लागते.मात्र, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून साहित्य पोहोचवणे खर्चिक, हवामानावर अवलंबून आणि वेळखाऊ असते. अशा परिस्थितीत ड्रोन हा जलद, किफायतशीर आणि सुरक्षित पर्याय म्हणून पुढे आला आहे.
भारतीय लष्कराने यापूर्वीच ‘अश्नी प्लाटून’सारख्या छोट्या सामरिक युनिट्सपासून मोठ्या ‘बॅटलफिल्ड एअर सपोर्ट’ बटालियनपर्यंत एक स्तरित ड्रोन धोरण तयार केले आहे.मात्र, हे काम तितके सोपेही नाही. समुद्रसपाटीपासून 15,000 फूट उंचीवर हवेची घनता सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे ड्रोनच्या पंखांना पुरेसा हवेचा दाब मिळत नाही आणि परिणामी लिफ्ट तसेच थ्रस्ट मोठ्या प्रमाणात कमी होतो.समस्या एवढ्यावरच थांबत नाही. हवेची घनता कमी असल्याने ड्रोनच्या मोटर्सना पुरेसे थंड होणे शक्य होत नाही. त्यामुळे जड वजन वाहताना मोटर्स लवकर गरम होऊन निकामी होण्याचा धोका असतो.
कडाक्याच्या थंडीमध्ये लिथियम-आधारित बॅटऱ्यांची कार्यक्षमता कमी होते. समुद्रसपाटीवर एखादी बॅटरी 6 मिनिटांचा फ्लाइट टाइम देत असेल, तर उंच पर्वतीय भागात ती केवळ 2 ते 3 मिनिटेच टिकू शकते.त्यामुळे उड्डाण करण्यापूर्वी बॅटऱ्या गरम करणे आणि हवेत असताना त्यांचे योग्य प्रकारे इन्सुलेशन करणे आवश्यक ठरते.या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी भारतीय लष्कराने लडाख आणि हिमाचल प्रदेशातील स्पिती खोऱ्यासारख्या दुर्गम भागांमध्ये देशातील ड्रोन निर्मात्यांसोबत काम केले आहे. या चाचण्यांच्या आधारे लष्कराने अनेक स्वदेशी ड्रोन उत्पादनांची शॉर्टलिस्ट केली आहे.
याच प्रक्रियेअंतर्गत यावेळी 225 FPV ड्रोनची ऑर्डर एअरोड्रोन रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेडला मिळाली आहे. ही कंपनी लष्करी ड्रोन, पाळत ठेवण्यासाठीची (सर्व्हिलन्स) आणि रसद वाहतूक करणारी प्लॅटफॉर्म्स तयार करण्यासोबतच ड्रोन ऑपरेटरना प्रशिक्षणही देते.या कंपनीने विकसित केलेले सॉफ्टवेअर देशांतर्गत म्हणजेच इन-हाऊस विकसित केलेले आहे. त्यामुळे हा करार ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode