
मुंबई, ९ ऑक्टोबर (हिं.स.) : पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. हे जाणवलं. येत्या काही दिवसांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात एक चांगली बातमी येईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडिया पोस्टमधून केलं आहे.
पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा आज नववा दिवस होता. काल पुणे पोलिसांनी एस.एम जोशी पूल मोकळा करा, असं आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितलं. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत विद्यार्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आंदोलनावर ठाम आहेत. याचदरम्यान राज ठाकरे यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगली बातमी येणार, अशी माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर ठाकरेंनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 5 ऑक्टोबर 2026 ला मी जेव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी