
भाजपचे 8, तर समाजवादी पक्षाचे 2 उमेदवार विजयी
लखनऊ, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. भाजपचे 8 तर समाजवादी पक्षाचे (सपा) 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान बाद झाल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत कोणत्याही उमेदवाराने माघार न घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. परिणामी, 16 ऑक्टोबर रोजी नियोजित असलेले मतदान घेण्याची आवश्यकता राहिली नाही.
भाजपकडून निवडून आलेल्या 8 सदस्यांमध्ये धर्मपाल सिंह, प्रकाश पाल, श्रुती गंगवार, विद्यासागर सोनकर, प्रियांका सिंह रावत, राधाकांत ओझा, गोपी कृष्ण पांडेय आणि राम प्रताप सिंह चौहान यांचा समावेश आहे.
समाजवादी पक्षाकडून ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे मुख्य राष्ट्रीय महासचिव प्रा. रामगोपाल यादव, तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक धनराज परिमल नथवानी हे दोघे राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्जांची छाननी करताना तेलंगणातील कांटे सायन्ना आणि लखनौ येथील ओंकारनाथ चौरसिया या दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. उमेदवारी अर्जासाठी आवश्यक असलेले 10 आमदारांचे प्रस्तावक त्यांच्या अर्जांमध्ये नव्हते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुमार वर्मा यांनी छाननीदरम्यान त्यांचे अर्ज अवैध ठरवले. यानंतर 10 जागांसाठी नेमके 10 वैध उमेदवार शिल्लक राहिले. शुक्रवारी 9 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर या सर्व उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली.
बसपचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व संपणार
उत्तर प्रदेशातील या 10 विद्यमान राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपत आहे. यापूर्वी या दहा जागांपैकी 8 जागा भाजपकडे, तर प्रत्येकी 1 जागा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाकडे (बसप) होती. उत्तर प्रदेश विधानसभेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार भाजपप्रणीत आघाडीला 8, तर समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत. या निकालामुळे बसपचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व संपुष्टात आले आहे.राज्यसभेतील या निवडणूक निकालामुळे उत्तर प्रदेशातील संसदीय राजकारणातील पक्षीय प्रतिनिधित्वात बदल होणार असून, भाजप आणि समाजवादी पक्षाच्या संख्याबळात त्यानुसार वाढ होईल.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी