
* संयुक्तपणे 'मलेशिया कॉलिंग' मोहिमेची सुरुवात
* भारतीय प्रवाशांना मिळणार नवा अनुभव
मुंबई, ९ ऑक्टोबर (हिं.स.) : भारताची आघाडीची ट्रॅव्हल फिनटेक कंपनी 'स्केपिया' (Scapia) आणि 'टूरिझम मलेशिया' यांनी संयुक्तपणे 'मलेशिया कॉलिंग' या चार महिन्यांच्या विशेष मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश भारतीय प्रवाशांना केवळ पारंपरिक क्वालालंपूर आणि गेंटिंग हायलँड्सपुरते मर्यादित न राहता मलेशियाच्या संस्कृती, निसर्ग आणि साहसी ठिकाणांचा अधिक व्यापक अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
या भागीदारीबाबत बोलताना स्केपियाचे स्ट्रॅटेजिक अँड ट्रॅव्हल पार्टनरशिपचे प्रमुख आनंद कंदाडाई म्हणाले की, आमच्या प्रवाशांचा मलेशियाकडे वाढता कल पाहता त्यांना देशाचे आणखीन सुंदर पैलू शोधण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. या मोहिमेमुळे ग्राहकांना उत्तम रिवॉर्ड्स आणि ऑफर्ससह एक उत्तम प्रवासाचा अनुभव घेता येईल.
मलेशियाच्या मुंबईतील कौन्सिल जनरल मिस नजवा मुश्रीफा रामली यांनी सांगितले की, भारत हा मलेशियासाठी अत्यंत महत्त्वाचा पर्यटन बाजार आहे. भारतीय पर्यटक आता परिचित मार्गांपेक्षा नवीन ठिकाणांना पसंती देत आहेत. डिसेंबर २०२३ पासून लागू करण्यात आलेल्या व्हिसा-मुक्त प्रवेशामुळे जानेवारी ते ऑगस्ट २०२६ दरम्यान ९ लाख ६२ हजार ९८३ भारतीय पर्यटकांनी मलेशियाला भेट दिली आहे. सध्या भारतामधील १० हून अधिक शहरांमधून दर आठवड्याला १९३ थेट विमाने मलेशियासाठी उपलब्ध असून, या दरम्यान दोन्ही देशांमधील पर्यटनाला अधिक बळकटी मिळत आहे.
गेल्या काही काळापासून भारतातून मलेशियाला भेट देणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. स्केपिया प्लॅटफॉर्मवर मलेशियाच्या फ्लाइट बुकिंगमध्ये सुमारे ४ पट तर हॉटेल बुकिंगमध्ये दुप्पट वाढ नोंदवली गेली आहे. या वाढत्या मागणीला अधिक चालना देण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली असून, याद्वारे सबाह, सारावाक, पेनांग, मेलाका आणि लैंगकावी यांसारख्या वैविध्यपूर्ण ठिकाणांची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवली जाईल. तसेच ग्राहकांना फ्लाइट्स, हॉटेल्स आणि विविध अनुभवांवर आकर्षक सवलती आणि बोनस 'स्केपिया कॉइन्स'चा लाभ मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी