
वर्धा, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। अल्प पर्यजन्यमानामुळे पाणी टंचाईचे संकट आहे. जिल्ह्यात पाणी समस्या अधिक भेडाऊ नये या हेतूने जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी नियोजन करण्यात केले आहे. यात प्राधान्यक्रम ठरविताना पिण्याच्या पाण्याला प्रथम स्थान देण्यात आले आहे. तर शेतीचे पाणी दुय्यम ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सात तालुके दुष्काळी ट्रिगर-१ या यादीत आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, जलाशय, नदी, तलाव, बंधारे, विहिरी, बोअरवेल, पाणी पुरवठा योजना कोणत्याही वेळी कोरड्या पडू शकतात अशी स्थिती आहे. अल निनोचा प्रभाव आणखी वाढून त्याचे विपरित परिणाम जिल्ह्यावरही होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वैध शेती पाणी वापरावर अकारण कारवाई होऊ नये याबाबीचा विचार करून जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष म्हणून आदेश निर्गमित केला आहे.
पाणी वापराचा प्राधान्यक्रम
मानवासाठी पिण्याचे पाणी जनावरांना पिण्यासाठी पाणी तसेच चारा याकरिता पाणी उभ्या पिकांसाठी आवश्यक व मर्यादित सिंचन पाणी टंचाईच्या काळात ऊस व पाण्याची अधिक गरज असणा-या पिकांना शेवटचे प्राधान्य
धडक कारवाईसाठी विशेष पथक
पाण्याचा अवैध उपस्याचा शोध, तपासणी, पंचनामा, जप्ती व कायदेशीर कारवाईकरिता तालुकास्तरीय विशेष पथकांची स्थापना केली आहे. यात अध्यक्ष म्हणून तहसीलदार, सदस्य सचिव म्हणून जलसंपदा व जलसंधारण विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता तर सदस्य म्हणून संबंधित मंडळ अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रभारी, पाणी पुरवठा किंवा पंचायत समिती तथा नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता, भूजल सर्वेक्षण व विकस यंत्रणेचे प्रतिनिधी, महावितरणचे प्रतिनिधी, संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांचा समावेश आहे. यांच्या मदतीला महसूल मंडळनिहायही भरारी पथक राहणार आहेत.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी