
नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कॉलमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव थेट मोबाईलच्या स्क्रीनवर दिसण्याची सुविधा सुरू होणार आहे. दूरसंचार विभागाने १ नोव्हेंबर २०२६ पासून कॉल करणाऱ्याचे नाव दाखवणारी नवी व्यवस्था लागू करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना निर्देश दिले आहेत. या सुविधेमुळे एअरटेल, जिओ, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांच्या ग्राहकांना अनोळखी कॉल ओळखणे सोपे होणार आहे.
या नव्या व्यवस्थेला ‘कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सर्व्हिस’ अर्थात सीएनएपी असे नाव देण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत ४जी आणि त्यापुढील तंत्रज्ञानावर आधारित नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नोंदणीकृत नाव मोबाईलच्या पडद्यावर दिसू शकते. विशेष म्हणजे, यासाठी ट्रूकॉलर यांसारखे कोणतेही स्वतंत्र अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याची किंवा वेगळी सेवा सुरू करण्याची आवश्यकता राहणार नाही.
कशी काम करणार नवी व्यवस्था
या प्रणालीमध्ये दूरसंचार कंपन्या ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकासोबत त्यांच्या नोंदणीकृत नावाची माहिती उपलब्ध ठेवतील. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या क्रमांकावर कॉल केल्यानंतर संबंधित दूरसंचार कंपनीच्या यंत्रणेद्वारे कॉल करणाऱ्याच्या नावाची माहिती मिळवली जाईल. त्यानंतर मोबाईलच्या पडद्यावर क्रमांकासोबत संबंधित व्यक्तीचे नाव दिसेल. मात्र, कॉल करणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक आधीपासूनच मोबाईलमध्ये साठवलेला असल्यास संपर्क यादीतील नाव दिसू शकते.
सर्व ग्राहकांना लगेच सुविधा मिळणार नाही
१ नोव्हेंबरपासून ही व्यवस्था लागू करण्याचे निर्देश दिले असले, तरी सर्व ग्राहकांना एकाच वेळी या सुविधेचा लाभ मिळेलच असे नाही. संबंधित दूरसंचार कंपन्यांकडून तंत्रज्ञानाची अंमलबजावणी कशा प्रकारे आणि किती वेगाने केली जाते, यावर प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध होण्याचे अवलंबून असेल.
दरम्यान, परदेशातून येणाऱ्या कॉलच्या बाबतीत मोबाईलच्या स्क्रीनवर संबंधित व्यक्तीचे नाव दिसण्याऐवजी ‘इंटरनॅशनल कॉल’ असा संदेश दिसू शकतो. तसेच कॉल करणाऱ्याने आपला क्रमांक आणि ओळख समोरच्या व्यक्तीला दिसू नये यासाठी सीएलआयआर ही सुविधा घेतली असल्यास त्याचे नावही दिसणार नाही. त्यामुळे नव्या व्यवस्थेमुळे अनोळखी कॉल ओळखणे सोपे होणार असले, तरी काही अपवाद कायम राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule